
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील आपल्या दालनात प्रवेश करून कामकाजाला प्रारंभ केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील यावेळी उपस्थित होते. फडणवीस यांनी शिंदेच्या हाताला धरून मुख्यमंत्रयांच्या खुर्चीवर बसविले. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना मंत्रालयातील त्यांच्या दालनात फारसे फिरकले नव्हते. त्यामुळे मंत्रालयातील सहावा मजला हा त्यांच्या कारकिर्दीत सुनसानच असायचा. मात्र आता पुन्हा एकदा सहावा मजला गजबजलेला दिसणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सकाळी मंत्रालयात सहाव्या मजल्यावर आपल्या दालनात प्रवेश करुन कामकाजाला प्रारंभ केला. शपथविधीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने कामकाजाला सुरुवात केली होती. परंतू प्रथमच मुख्यमंत्री राज्याचे प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मंत्रालयातील आपल्या दालनात दाखल झाले. तसेच त्यांनी लगेचच विविध विषयांवरील बैठकांना उपस्थिती देऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या.यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, वडील संभाजी शिंदे, मुलगा खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे, नातू रुद्रांश उपस्थित होते.मंत्रालयातील सहाव्या मजल्याला विशेष महत्व आहे. कारण मुख्यमंत्र्यांचे केबिन या मजल्यावर आहे. या मजल्यावर विशेष सुरक्षाही असते. मात्र उदधव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदावर असताना त्यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानावरूनच कामकाज करणे पसंत केले होते. कोरोनाची साथ हे त्यामागचे कारण होते. मुख्यमंत्री मंत्रालयातच येत नाहीत, यावरून त्यांच्यावर अनेकदा टीका देखील झाली होती. उद्धव ठाकरे मंत्रालयात येत नसल्याने त्याचा नाही म्हणायला मंत्रालयातील प्रशासकीय यंत्रणेवर परिणाम देखील झाला होता. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयातील त्यांच्या दालनातून कारभार सुरू केला आहे. नगरविकास मंत्री असताना देखील एकनाथ शिंदे हे त्यांच्या मंत्रालयातील दालनात उपस्थित असायचे. त्यांच्या दालनात त्यावेळीही कायम गर्दी असायची. आता तेच चित्र परत एकदा दिसणार आहे.