स्मृतिदिनाला गालबोट लागू नये म्हणून पूर्वसंध्येला दर्शन घेतले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण

या राड्यानंतर दादरच्या शिवाजी पार्क परिसरात तणावाचे वातावरण होते. त्यामुळे मोठा फौजफाटा शिवाजी पार्क परिसरात तैनात करण्यात आला होता.
स्मृतिदिनाला गालबोट लागू नये म्हणून पूर्वसंध्येला दर्शन घेतले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
Published on

मुंबई : बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर ठाकरे-शिंदे गटाचे कार्यकर्ते गुरुवारी रात्री भिडले. या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. “मी शुक्रवारी जाऊनही दर्शन घेऊ शकलो असतो, पण स्मृतिदिनाला गालबोट लागू नये म्हणून आम्ही पूर्वसंध्येला जाऊन दर्शन घेतले,” असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

“ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे,” असेही मुख्यमंत्री म्हणाले. या राड्यानंतर दादरच्या शिवाजी पार्क परिसरात तणावाचे वातावरण होते. त्यामुळे मोठा फौजफाटा शिवाजी पार्क परिसरात तैनात करण्यात आला होता. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली असल्याचा आरोप शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केला.

“ही घटना अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय आहे. दरवर्षी अगदी शांततेत आणि व्यवस्थित बाळासाहेबांचा स्मृतिदिन साजरा होतो. महाराष्ट्रभरातून कार्यकर्ते स्मृतिस्थळाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला वाद नको होता. या दिवसाला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागावे, अशी आमची इच्छा नव्हती. म्हणूनच आम्ही आदल्या दिवशी जाऊन स्मृतिस्थळाचे दर्शन घेतले. माझ्यासोबत खासदार, आमदार आणि पदाधिकारी होते. आम्ही शांततेत दर्शन घेतले. पण तिथे येऊन जाणीवपूर्वक घोषणाबाजी करणे, महिलांना धक्काबुक्की करणे ही बाब अत्यंत निंदनीय आहे,” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in