शिवसैनिकांसाठी रविवार ‘काळा दिवस’! मुख्यमंत्री शिंदे यांचे ठाकरेंवर टीकास्त्र

आज सत्तेसाठी, खुर्चीसाठी, मुख्यमंत्रीपदासाठी त्यांच्याजवळ जाऊन बसले आहेत. जे आपल्या देशाची बदनामी परदेशात जाऊन करतात, पंतप्रधानांची बदनामी विदेशात जाऊन करतात, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणे हे दुर्दैवी असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
शिवसैनिकांसाठी रविवार ‘काळा दिवस’! मुख्यमंत्री शिंदे यांचे ठाकरेंवर टीकास्त्र

मुंबई : शिवसेनेसाठी आणि शिवसैनिकांसाठी रविवार हा ‘काळा दिवस’ असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. ज्या शिवतीर्थावरून स्वर्गीय बाळासाहेबांनी संपूर्ण हिंदुस्थानाला मार्गदर्शन केले, तेथेच त्यांच्या वारसदाराला ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला त्या राहुल गांधी यांच्या मांडीला मांडी लावून बसायची वेळ आली आहे. यातून बाळासाहेबांचे विचार उद्धव ठाकरे यांनी संपवले असल्याचे स्पष्ट होते, अशी टीका त्यांनी केली.

खरे तर राहुल गांधी यांनी सर्वप्रथम सावरकर स्मारकात जाऊन त्यांना अभिवादन करायला हवे, कारण सावरकर ही देशाची अस्मिता आहे. त्यांच्यावर वाट्टेल ते आरोप करणं, त्यांना शिव्याशाप देणे हे कोणते हिंदुत्व आहे? आणि सावरकरांचा होत असलेला अपमान निमूटपणे सहन करणे हे शिवसैनिकांचे दुर्दैव आहे. उद्धव ठाकरे हे ‘गर्व से कहो हम हिंदू है’ आता कोणत्या तोंडाने म्हणणार? असा सवालही शिंदे यांनी विचारला. त्यामुळे आजचा दिवस हा शिवसेना आणि शिवसैनिकांसाठी ‘काळा दिवस’ आहे, असे मत शिंदे यांनी व्यक्त केले. ठाकरे गटाचे नंदुरबारचे विधान परिषद आमदार आमश्या पाडवी यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. ‘ज्या काँग्रेसला बाळासाहेबांनी कायम दूर ठेवले त्यांच्यासोबत बसायची वेळ आली, तर मी माझे दुकान बंद करेन, असे मत व्यक्त केले होते. तेच आज सत्तेसाठी, खुर्चीसाठी, मुख्यमंत्रीपदासाठी त्यांच्याजवळ जाऊन बसले आहेत. जे आपल्या देशाची बदनामी परदेशात जाऊन करतात, पंतप्रधानांची बदनामी विदेशात जाऊन करतात, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणे हे दुर्दैवी असल्याचे मत शिंदे यांनी व्यक्त केले.

logo
marathi.freepressjournal.in