मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून 'उद्धव ठाकरे गट' असा उल्लेख; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत राज्यात सत्तांतर घडवून आणले; मात्र नवीन सरकार स्थापन झाल्यानंतरही मूळ शिवसेना कुणाची, हा प्रश्न कायम आहे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून 'उद्धव ठाकरे गट' असा उल्लेख; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Published on

खरी शिवसेना आमचीच, असा दावा शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्याकडून केला जात असतानाच हा वाद आता सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी रंगलेल्या राज्यातील विविध ग्रामपंचायतींच्या निवडणुकीनंतर ‘उद्धव ठाकरे गट’ असा उल्लेख केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत राज्यात सत्तांतर घडवून आणले; मात्र नवीन सरकार स्थापन झाल्यानंतरही मूळ शिवसेना कुणाची, हा प्रश्न कायम आहे. राज्यातील काही ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल हाती लागल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ट्विटद्वारे कार्यकर्त्यांचे आणि मतदारांचे आभार मानले. ते म्हणाले की, “राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना-भाजप युती सरकारला जनतेचा कौल मिळाला आहे. शिवसेना-भाजप युतीच्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन. तसेच निवडणुकीत मेहनत घेतलेल्या सर्व शिवसेना-भाजप युतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारराजाचेही अभिनंदन व आभार.” मात्र खाली दिलेल्या आकडेवारीत उद्धव ठाकरे गटाला किती जागा मिळाला, हा उल्लेख त्यांनी केला आहे.

याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख टाळला होता. आपल्या शुभेच्छामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केवळ माजी मुख्यमंत्री असा केला होता.

logo
marathi.freepressjournal.in