मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुखपदी नरेश म्हस्के यांची पुनर्नियुक्ती

शिवसेनेतून हकालपट्टी अथवा पदावरून हकालपट्टी करण्याच्या निर्णयाला शिंदे गटाकडून आव्हान
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुखपदी नरेश म्हस्के यांची पुनर्नियुक्ती
ANI
Published on

शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख या पदावर नरेश म्हस्के यांची पुनर्नियुक्ती करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या ३८ पेक्षा जास्त आमदारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ म्हस्के यांनी जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर म्हस्के यांची या पदावरून हकालपट्टी करत असल्याचे ‘सामना’ दैनिकातून ज़ाहीर करण्यात आले होते. मात्र, ही हकालपट्टी आता बेकायदेशीर ठरवून धुडकावण्यात आली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्ववादी विचारांचा ध्वज हाती घेणाऱ्या कट्टर शिवसैनिकांला पदावरून हटविण्याचे अधिकार ‘सामना’ला नाहीत, असे स्पष्ट करत जिल्हाप्रमुखपदी नव्या जोमाने काम करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेश म्हस्के यांना दिले आहेत.

शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची पुन्हा त्याच पदांवर पुनर्नियुक्ती

गुरूवारी रात्री नरेश म्हस्के यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी जिल्हाप्रमुख पदाची सुत्रं पुन्हा म्हस्के यांच्या हाती सोपविताना ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील पक्ष विस्ताराच्या मोहिमेबाबत मुख्यमंत्र्यांनी त्यांना मार्गदर्शन केले. आजपर्यंत मनमानी पद्धतीने हकालपट्टी केलेल्या शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची पुन्हा एकदा त्याच पदांवर पुनर्नियुक्ती करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

logo
marathi.freepressjournal.in