मुंबईची तुंबई झाली, तर अधिकारी घरी!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा; काम उत्तम तर बक्षीस, अन्यथा नारळ
मुंबईची तुंबई झाली, तर अधिकारी घरी!

मुंबई : यंदाच्या पावसाळ्यात मुंबईची तुंबई झाली तर त्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई होणार, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. मुंबई ठप्प झाली नाही संबंधित अधिकाऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येईल, असे ही त्यांनी स्पष्ट केले. गुरुवारी शिंदे यांनी बीकेसी येथील मिठी नदी, बीकेसीतील भारत नगर येथील वाकोला नदी, दादर येथील प्रमोद महाजन उद्यानातील पाणी साठवण टाकीचे व वरळी येथील लव्हग्रोव्ह पंपिंग स्टेशन या ठिकाणच्या कामाची पहाणी त्यांनी केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ३१ मे अखेरपर्यंत नाल्यातील गाळ उपसा करण्याचे टार्गेट आहे.


पावसाळ्यापूर्वी ६ एप्रिलपासून नालेसफाईची कामे हाती घेतली असून आतापर्यंत ८८.५३ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित १२ टक्के गाळ उपसा १३ दिवसांत पूर्ण करण्याचे टार्गेट आहे. एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामाची पहाणी गुरुवारी केली. नालेसफाईच्या कामात गाळ उपसा करण्यासाठी तळ गाठा अगदी खडक लागेपर्यंत गाळ उपसा करा, अशी सूचना यावेळी शिंदे यांनी पालिका आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल यांना केली. दरम्यान, नदीतील गाळ उपसा करण्याचे काम वेगाने सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सूचनेनुसार खालपर्यंत गाळ उपसा करण्यात येईल आणि त्यासाठी कंत्राटदाराला अतिरिक्त पैसे देण्यात येईल, असे आयुक्त व प्रशासक डॉ इक्बाल सिंग चहल यांनी स्पष्ट केले.


नालेसफाई होणे गरजेचे आहे. नाल्यांतील किती गाळ उपसा केला या टक्केवारीत मी जात नाही. टक्केवारी पहाणारे गेले असा टोला शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना यावेळी लगावला. मुंबईत ज्या सखल भागात पाणी साचते त्या ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करा, अशी सूचना पालिका प्रशासनाला केल्याचे शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, अधिकाऱ्यांनी नालेसफाईची कामे कंत्राटदारांमार्फत प्रामाणिकपणे करुन घेतली, गाळ खोलवर जाऊन काढला, पावसाळ्यात सखल भागात साचणाऱ्या पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने केला तर पाणी साचणार नाही, आणि मुंबईकरांना दिलासा मिळेल, असेही शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.


रस्त्यासाठी ६०० कोटी रुपये दिलेच नाही!
रस्ते कामे सुरू नसताना पालिका प्रशासनाने कंत्राटदाराला आगाऊ ६०० कोटी रुपये देऊ नये, अशी सूचना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला होता. मात्र आदित्य ठाकरे यांच्या आरोपात तथ्य नसून कुठल्या कंत्राटदाराला पैसे दिले नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.


फुटपाथ मोकळे करा!


पावसाळ्यात रेल्वे हद्दीतील रुळ पाण्याखाली जातात आणि मुंबईकरांची लाईफ लाईन ठप्प होते. रेल्वे प्रवाशांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी रेल्वे हद्दीतील कनव्हर्टर, गटारे साफ करा, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. पावसाळ्यात रस्ते अपघात होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी पादचाऱ्यांना चालण्यासाठी फुटपाथ मोकळे करा, अशी सूचना शिंदे यांनी केली.


पाहणी दौऱ्यात शक्तिप्रदर्शन


एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी नालेसफाईच्या कामाची पहाणी केली. यावेळी पालिका अधिकाऱ्यापेक्षा शिंदे यांच्या समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे शिंदे यांच्या पहाणी दौऱ्यात शिंदेंच्या शिवसेनेकडून शक्तिप्रदर्शन होते, अशी चर्चा पालिका अधिकाऱ्यांमध्ये सुरू होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in