मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं राज्यातील जनतेला आवाहन ; म्हणाले, "देशातील पहिल्याक्रमांकावर..."

स्वच्छता आपल्या सर्वाच्या दैनंदिन जीवनातील अत्यंत महत्वाची गोष्ट आहे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं राज्यातील जनतेला आवाहन ; म्हणाले, "देशातील  पहिल्याक्रमांकावर..."

रविवारी १ ऑक्टोबर रोजी राबवण्यात येणाऱ्या 'एक तारीख, एक तास' या उपक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. या उपक्रमात राज्याला संपूर्ण देशात पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवून देऊ, असं देखील शिंदे म्हणाले.

देशभरात 'स्वच्छता पंधरवडा- स्वच्छता ही सेवा' या अभियानांतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी रविवारी १ ऑक्टोबर रोजी राज्याभरात 'एक तारीख- एक तास' या उपक्रमांतर्गत प्रत्येकाला ते जिथे कुठे असतील तिथे स्वच्छता, साफ-सफाई करून या अभियानात सहभाग नोंदवण्याचं आवाहन शिंदे यांनी केलं आहे. हे अभियान शंभर टक्के यशस्वी करून देशात आपल्या महाराष्ट्राला अव्वल स्थान मिळवून देऊ, असं देखील ते म्हणाले. "चला महाराष्ट्र कचरा मुक्त करूया, स्वच्छ, सुंदर करूया. आरोग्य आणि समृद्धीला गवसणी घालूया. स्वच्छतेचा जागर करूया,” असं आवाहन राज्यातील जनतेला मुख्यमंत्र्यांनी केलं.

स्वच्छता आपल्या सर्वाच्या दैनंदिन जीवनातील अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. स्वच्छता आपल्या आयुष्यात समृद्धी आणते. स्वच्छतेचा आरोग्य आणि आपल्या परिसराची दृढ संबंध आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यापासून अनेक थोर राष्ट्र पुरूष साधू-संत यांनी देखील स्वच्छतेबाबत आपल्याला धडे घालून दिले आहेत. संत गाडगेबाबांनी हाती झाडू घेऊन स्वच्छतेचे धडे दिले आहेत. या धड्यांची आपल्यालाउजळणी करायची आहे. आपापल्या परिसरात महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत तसंच ग्रामपंचायतींच्या पुढाकारांनी स्वच्छता मोहिम राबवायची आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in