मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा थक्क करणारा प्रवास,सातारा जिल्ह्याने चौथा मुख्यमंत्री महाराष्ट्राला दिला

आनंद दिघे यांनी १९८४ मध्ये किसननगर येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा थक्क करणारा प्रवास,सातारा जिल्ह्याने चौथा मुख्यमंत्री महाराष्ट्राला दिला
ANI

मुळचे दरेतांबे गावचे असलेले एकनाथ शिंदे यांनी वयाच्या २० व्यावर्षी शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारण व राजकारणात प्रवेश केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तेजस्वी विचारांनी आणि ओजस्वी वाणीने भारावलेल्या पिढीचा तो काळ होता. ठाण्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली तरुण मंडळी शिवसेनेच्या झेंड्याखाली जमा होत होती. अशा वातावरणात एकनाथ शिंदे यांनीही शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. आनंद दिघे यांनी १९८४ मध्ये किसननगर येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केली. तेव्हापासून दिघे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनांमध्ये एकनाथ शिंदे यांनी भाग घेतला. १९८६ साली सीमाप्रश्नी झालेल्या आंदोलनात एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील शिवसेनेच्या १०० कार्यकर्त्यांसह भाग घेतला होता. त्यावेळी बेल्लारी येथील तुरुंगात त्यांना ४० दिवस कारावास झाला होता. त्यानंतर प्रकाशझोतात आलेल्या एकनाथ शिंदे यांनी कधीही मागे वळून पाहिलेले नाही. सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून येत विरोधी पक्षनेता तसेच मंत्रिपदेही भूषवली आहेत. सातारा जिल्ह्याने त्यांच्या रूपाने चौथा मुख्यमंत्री महाराष्ट्राला दिला आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत जवळपास ५० पेक्षा जास्त आमदारांचे पाठबळ मिळवून शिवसेनेला अक्षरश: खिंडार पाडले. आधी सुरत आणि नंतर गुवाहाटी असा प्रवास करत बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या गटात शिवसेनेचे ४० पेक्षा जास्त आणि १० अपक्ष आमदार सामील झाले. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडणार आणि नवे सरकार येणार, हे निश्चित झाले होते. मात्र हे बंड किती काळ लांबणार, हे कुणालाही माहित नसल्याने आषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार की देवेंद्र फडणवीस करणार, ही चर्चा राज्यातील जनतेमध्ये रंगली होती. आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून ना उद्धव, ना देवेंद्र आता एकनाथ शिंदेच विठ्ठलाची महापूजा करणार, हे सिद्ध झाले आहे.

गेल्या काही दिवसांतील राज्यात वेगवान घडामोडी घडल्यानंतर राज्यपालांसह सर्वोच्च न्यायालयानेही बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासह विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे नवे सरकार स्थापन होऊन फडणवीस मुख्यमंत्री तर शिंदे उपमुख्यमंत्री होणार हे निश्चित होते. पण धक्कातंत्राचा वापर करत फडणवीस यांनी स्वतः मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे गेल्या आठवडाभरापासून शिवसेना-भाजपच्या समर्थकांकडून विचारला जाणारा आषाढीला विठ्ठलाचा महापूजा कोण करणार? हा प्रश्न निकाली निघाला आहे. ना ठाकरे ना फडणवीस, विठ्ठलाच्या भेटीला एकनाथच जाणार हे आता स्पष्ट झाले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in