शिंदे गटातील भाऊ-भाई वाद मिटला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मध्यस्थी

गजानन कीर्तिकर यांनी देखील माझ्याकडून या वादावर आता पडदा टाकण्यात आला आहे. रामदास कदम आरोप करतात म्हणून मी आरोप करणार नाही
शिंदे गटातील भाऊ-भाई वाद मिटला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मध्यस्थी

मुंबई : ऐन दिवाळीतच शिवसेना शिंदे गटातील दोघा भाई आणि भाऊंमधील वाद विकोपाला गेला होता. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर हा वाद आता मिटला असून दिवाळी गोड झाली आहे. रामदास कदम आरोप करतात म्हणून मी प्रत्युत्तर देणार नाही. माझे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर माझा विश्वास आहे. माझ्याकडून या वादावर आता पडदा टाकण्यात आल्याचे खा. गजानन कीर्तिकर यांनी स्पष्ट केले आहे. रामदास कदम यांनी देखील माझ्या गजाभाऊंना दिवाळीच्या शुभेच्छा असून आमच्यातील वाद आता मिटला असल्याचे स्पष्ट केले आहे.

गजानन कीर्तिकर हे मुंबईतील लोकसभेच्या उत्तर पश्चिम मतदारसंघातून खासदार आहेत. या मतदारसंघातून निवडणूक कोणी लढवायची, यावरून दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली होती. दोघांनीही एकमेकांवर यथेच्छ आरोप केले होते. अगदी वैयक्तिक आयुष्यालाही चव्हाट्यावर आणले. मात्र, या वादामुळे पक्षाची बदनामी होत असून विरोधकांना आयताच मुद्दा मिळत असल्याचे लक्षात घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वादात मध्यस्थी केली. रामदास कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. नंतर रामदास कदम यांनी हा वाद मिटल्याचे जाहीर करताना स्पष्ट केले, मला राजकारणातून संपविण्यासाठी प्रेसनोट काढणे किती योग्य होते. गजानन कीर्तिकर यांनी माध्यमांकडे न जाता मुख्यमंत्र्यांकडे जावे, अशा सूचना त्यांना देण्यास मी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. मी गजाभाऊंना दिवाळीच्या शुभेच्छा देतो. भविष्यात आमच्यात राजकीय वाद होणार नाहीत. आमचा वाद शंभर टक्के मिटला असल्याचे रामदास कदम म्हणाले.

गजानन कीर्तिकर यांनी देखील माझ्याकडून या वादावर आता पडदा टाकण्यात आला आहे. रामदास कदम आरोप करतात म्हणून मी आरोप करणार नाही. आम्हीच भांडत बसलो तर शिवसैनिकांत चुकीचा संदेश जाईल. मी माझ्या भावना मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केल्या आहेत. कदम यांनी कितीही टीका केली तरी मी कोणतेही वक्तव्य करणार नाही, असे गजानन कीर्तिकर यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in