
मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. हिंदुत्व, मुंबई बॉम्बस्फोट, दाऊद इब्राहिम आदी विषयावरुन शिंदेंनी ठाकरेंवर तोफ डागली. उद्धव ठाकरे निर्णय घेण्यास अपयशी ठरले, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
“आम्ही कोणतेही बेकायदेशीर काम करत नाही. लोकशाहीत कायदे आणि नियम असतात, त्यानुसार काम करावे लागते. जेव्हा हिंदुत्व, दाऊद इब्राहिम, मुंबई बॉम्बस्फोट असे अनेक मुद्दे समोर आले तेव्हा महाविकास आघाडी सरकार निर्णय घेण्यास अपयशी ठरले. सरकारच्या लोकांना कोणताही निर्णय घेता आला नाही. दाऊद इब्राहिमशी संबंधित मुद्दे पुढे आले. मुंबईत दंगली झाल्या, पण मविआ सरकारने कोणताही ठोस निर्णय घेतला नाही,” असा गंभीर आरोप शिंदेंनी केला.
“शिवसेना-भाजप एकत्र निवडणुका लढले, मात्र शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केले. आज आपल्याकडे बहुमत आहे. सर्वोच्च न्यायालयात आमच्याविरोधात गेलेल्या लोकांनाही न्यायालयाने फटकारले आहे. देवेंद्र फडणवीस मोठ्या मनाने उपमुख्यमंत्री झाले,पण पक्षाचा आदेश आला की ते पक्षाचा आदेश पाळतात. त्यांनी माझ्यासारख्या बाळासाहेबांच्या कार्यकर्त्याला मुख्यमंत्रिपदावर बसवले. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचे आभार मानतो,” असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, “आम्ही निवडणूक जिंकतो तेव्हा मतदारसंघातील लोकांना विकासाच्या अपेक्षा असतात, पण आमचे आमदार काम करू शकले नाहीत आणि निधीची कमतरता होती. याबाबत वरिष्ठांशी बोलूनही यश मिळाले नाही. त्यामुळेच आमच्या ४०-५० आमदारांनी ही भूमिका घेतली. आम्ही महाविकास आघाडीत बसलो आहोत, त्याचा फायदा नाही, तोटा होत आहे, अशी चर्चा मी अनेकदा केली आहे. उद्या निवडणूक कशी लढवायची या चिंतेत आमचे आमदार आहेत. नगरपंचायत निवडणुकीत आम्ही चौथ्या क्रमांकावर गेलो. सरकारचा शिवसेनेला फायदा होत नव्हता. बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्वाच्या मुद्द्यावरची भूमिका, हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्याचा निर्णय आम्ही घेतला. आमच्या जवळपास ५० आमदारांनी एकाच वेळी अशी भूमिका घेतली तर यामागे मोठे कारण असेल, याचा विचार व्हायला हवा होता.”