मुख्यमंत्र्यांची बंडखोर मंत्र्यांवर मोठी कारवाई

लोकहिताच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांच्या खात्यांमध्ये फेरबदल
मुख्यमंत्र्यांची बंडखोर मंत्र्यांवर मोठी कारवाई
ANI

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर मंत्र्यांवर मोठी कारवाई केली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह आठ बंडखोर मंत्र्यांची खाती काढून घेण्यात आली आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील इतर मंत्र्यांकडे बंडखोरांकडून काढून घेण्यात आलेल्या खात्यांचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. लोकहिताच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांच्या खात्यांमध्ये फेरबदल केल्याचे महाराष्ट्र मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.

महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेचे ९ मंत्री एकनाथ शिंदे गटासोबत गेले आहेत. यानंतर उद्धव मंत्रिमंडळात शिवसेनेचे फक्त 3 उरले असून त्यापैकी एक म्हणजे मुख्यमंत्र्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांचा समावेश आहे. सुभाष देसाई आणि अनिल परब हे अन्य दोन मंत्री आहेत. याशिवाय शिवसेनेच्या कोट्यातील अन्य मंत्री एकनाथ शिंदे, उदय सामंत, दादाजी भुसे, संजय राठोड, गुलाबराव पाटील हे मंत्री सध्या गुवाहाटीमध्ये आहेत.

मुख्यमंत्री उद्धव यांनी एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास, सार्वजनिक बांधकाम खात्याचा कार्यभार मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे सोपवला आहे. अनिल परब यांच्याकडे गुलाबराव पाटील यांच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. उदय सामंत यांच्याकडून आदित्य ठाकरे यांच्याकडे उच्च शिक्षण खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in