बिहारमध्ये अडचणीत सापडलेल्या मराठी कुटुंबाला मुख्यमंत्र्यांची मदत,स्वखर्चातून एअर ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिल्या

मौजे गुरसाळे, ता. खटाव, जि. सातारा येथील अमोल जाधव यांचे कुटुंब उदरनिर्वाहासाठी बिहारमधील पाटणा येथे वास्तव्यास आहे
बिहारमध्ये अडचणीत सापडलेल्या मराठी कुटुंबाला मुख्यमंत्र्यांची मदत,स्वखर्चातून एअर ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिल्या

राज्याचा मुख्यमंत्री हा राज्यातील जनतेचा पालकही असतो, याची प्रचिती बिहारमध्ये अडचणीत सापडलेल्या मराठी कुटुंबाला आली. पाटणा येथे घरगुती गॅसच्या स्फोटात जखमी झालेल्या सातारा जिल्ह्यातील गुरसाळे येथील अमोल जाधव यांच्या दोन मुलांना तातडीने उपचारासाठी पुण्यात हलवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वखर्चातून दोन एअर ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिल्या आणि या दोन मुलांना तातडीने उपचार उपलब्ध करून दिले. मुख्यमंत्र्यांनी रात्रभर जागून निभावलेली ही पालकत्वाची भूमिका जाधव कुटुंबीयांना देवत्वाची प्रचिती देऊन गेली.

मौजे गुरसाळे, ता. खटाव, जि. सातारा येथील अमोल जाधव यांचे कुटुंब उदरनिर्वाहासाठी बिहारमधील पाटणा येथे वास्तव्यास आहे. शनिवारी मध्यरात्री २ वाजता त्यांच्या राहत्या घरात गॅसच्या गळतीने मोठा स्फोट झाला. यात अमोल जाधव, त्यांच्या दोन मुलांसह कुटुंबातील चारही सदस्य जखमी झाले. चौघांनाही तत्काळ पाटणा येथे खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले; परंतु तेथील डॉक्टरांनी जाधव यांच्या दोन्ही मुलांना पुढील उपचारांसाठी पुणे किंवा मुंबई येथे हलविण्यास सांगितले. दोन्ही मुलांना जास्त भाजल्यामुळे आणि वेळेत उपचार मिळण्यासाठी एअर ॲम्ब्युलन्सने पुण्याला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला; मात्र एका वेळी एकाच रुग्णाला नेण्याची एअर ॲम्ब्युलन्स कंपनीने तयारी दाखवली. त्यामुळे पुन्हा पंचायत झाली. जाधव कुटुंबीय हतबल झाले. हवाई वाहतुकीचा होणारा लाखोंचा खर्च कोठून करणार, हा गंभीर प्रश्न समोर राहिला. अमोल जाधव यांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या मूळ गावी अनेकांकडे मदतीचा हात मागितला; पण यश येऊ शकले नाही.

त्यावेळी एका नातेवाईकाने सांगली जिल्ह्यातील खानापूरचे आमदार अनिल बाबर यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संपर्क केला. नातेवाईकांनी सर्व हकिगत मुख्यमंत्र्यांना सांगितली. त्यानंतर तत्काळ सूत्रे फिरण्यास सुरुवात झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना अतितत्काळ, शासकीय एअर ॲम्ब्युलन्स मिळण्यासाठी विनंती केली; परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे शासकीय एअर ॲम्ब्युलन्स उपलब्ध होऊ शकली नाही. वेळ अतिशय नाजूक असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनाविलंब स्वखर्चातून दोन एअर ॲम्ब्युलन्स बुक केल्या. आणि अमोल जाधव यांच्या दोन्ही मुलांना दिवस उजडायच्या आत पुण्यात आणण्याचे आदेश शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांना दिले.

दिवस उजाडण्याच्या सुमारास पाहिले विमान पुण्यात दाखल झालेही. जखमींपैकी ११ वर्षांच्या मुलास घेऊन रविवारी सकाळी ६ वाजता स्पेशल विमान पुण्यातील लोहगाव विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर जखमींपैकी दुसऱ्या १२ वर्षांच्या बालकास घेऊन दुसरे विशेष विमान सकाळी ११ वाजता विमानतळावर दाखल झाले. दोन्ही जखमी मुलांना शिवसेना वैद्यकीय मदत समन्वयक राजाभाऊ भिलारे व युवराज काकडे यांच्या सहाय्याने पुण्यातील सूर्या सह्याद्री रुग्णालयात दाखल केले असून, येथे चांगल्याप्रकारे उपचार सुरू आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in