‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई हेल्पलाईन’ सुवर्णपदकाची मानकरी!

‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई हेल्पलाईन’ सुवर्णपदकाची मानकरी!

नागरी सुविधा दिल्याबद्दल पालिकेचा सन्मान

मुंबई : ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई हेल्पलाईन’च्या माध्यमातून मुंबईकरांना कचऱ्याशी संबंधित तक्रारींचे निवारणाची आधुनिक सुविधा दिल्याबद्दल मुंबई महापालिकेला सुवर्णपदकाने गौरविण्यात आले आहे. ईटी गव्हर्मेंट डिजिटेक कॉन्क्लेव्ह अँड अवॉर्ड २०२३ या गोव्यात नुकत्याच पार पडलेल्या परिषदेत हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. नागरी सेवा देतानाच माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल महानगरपालिकेला या सुवर्णपदकाने गौरविण्यात आले आहे.

या कामगिरीबद्दल महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांनी माहिती तंत्रज्ञान विभागाचे कौतुक केले आहे. माहिती तंत्रज्ञान विभागाने गतवर्षभरात मुंबईकरांच्या सेवेत तंत्रज्ञानावर आधारित विविध नागरी सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यात ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई हेल्पलाइन’ विशेष उल्लेखनीय ठरली आहे.

माहिती तंत्रज्ञान विभागाने पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या मदतीने नाल्यांमधून गाळ काढण्याच्या तक्रारींवर अतिशय गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी संघटितपणे काम केले. परिणामी, माहिती तंत्रज्ञानावर आधारित गुणवत्तापूर्ण हेल्पलाईन नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करून देणे शक्य झाले. महत्त्वाचे म्हणजे नागरिकांना हे तंत्रज्ञान सोयीस्कररित्या कशाप्रकारे हाताळता आणि वापरता येईल, या अनुषंगाने संपूर्ण टीमने परिश्रम घेतले. म्हणून माहिती तंत्रज्ञानावर आधारित सेवा उपलब्ध करून देत हा मैलाचा दगड गाठणे महानगरपालिकेला शक्य झाले आहे.

logo
marathi.freepressjournal.in