अंबरनाथ-बदलापूर स्थानकावरील गर्दी होणार कमी; चिखलोली रेल्वे स्थानक लवकरच प्रवाशांच्या सेवेत

अंबरनाथ आणि बदलापूर स्थानकावरील प्रवासी भार देखील कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.
अंबरनाथ-बदलापूर स्थानकावरील गर्दी होणार कमी; चिखलोली रेल्वे स्थानक लवकरच प्रवाशांच्या सेवेत

अंबरनाथ: बदलापूर आणि अंबरनाथ रेल्वे स्थानकांमध्ये नव्याने चिखलोली रेल्वे स्थानकाची उभारणी करण्यात येत आहे. या स्थानक उभारणीसाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून ७३.९२८ कोटी रुपयांच्या कामाचे कार्यादेश देण्यात आले आहेत. त्यानंतर आता स्थानकाचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू होणार असून येत्या काही महिन्यांत स्थानक सुरू होण्याची शक्यता आहे. विष्णू प्रकाश पुंगलीया कंपनीला हे काम देण्यात आले असून मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (एमआरव्हीसी) कडून याबाबत कंपनीला स्वीकृती पत्र देखील देण्यात आले आहे.

अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील वाढत्या लोकसंख्येचा भार पाहता या दोन्ही शहरांच्या मध्यस्थानी चिखलोली रेल्वे स्थानक असावे अशी गेल्या अनेक वर्षांपासून येथील स्थानिक नागरिकांची मागणी होती. याचबरोबर स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर देखील यासाठी आग्रही होते. त्यांच्या या सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे चिखली रेल्वे स्थानकाची भरण्याची काम प्रत्यक्ष मार्गे लागले असून येत्या कालावधीत हे स्थानक लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांच्या लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे दोन्ही शहरातील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची कायम गर्दी दिसून येत असते. या स्थानकाच्या उभारणीनंतर अंबरनाथ आणि बदलापूर स्थानकावरील प्रवासी भार देखील कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.

निविदा प्रक्रिया पार

चिखलोली रेल्वे स्थानकात जिने, पूल आणि जमिनीच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाकडून ऑक्टोबर महिन्यात ८१.९३ कोटी रुपयांची निविदा जाहीर करण्यात आली आहे. ही निविदा प्रक्रिया मार्गी लागून स्थानकाच्या प्रत्यक्ष उभारणीचे काम सुरू होणार होते. आता रेल्वे प्रशासनाकडून फलाट, शेड, पिलर, विद्युत वहिनी आणि इतर कामांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. ही प्रक्रिया पार पडली असून लवकरच ७३.९२८ कोटी रुपयांच्या निधीतून स्थानक उभारणीचे प्रत्यक्ष काम आता सुरू होणार आहे. यासाठी सबंधित कंपनीला मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडकडून स्वीकृती पत्र देखील देण्यात आले आहे

logo
marathi.freepressjournal.in