मुंबईत चिनी बनावटीची शस्त्रे जप्त; तीन तस्करांना अटक

चिनी बनावटीच्या बेकायदेशीर शस्त्रास्त्रांची विक्री करण्यासाठी आलेल्या ३ कुविख्यात गुंडांना मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे.
मुंबईत चिनी बनावटीची शस्त्रे जप्त; तीन तस्करांना अटक
मुंबईत चिनी बनावटीची शस्त्रे जप्त; तीन तस्करांना अटकप्रातिनिधिक प्रतिमा
Published on

मुंबई: चिनी बनावटीच्या बेकायदेशीर शस्त्रास्त्रांची विक्री करण्यासाठी आलेल्या ३ कुविख्यात गुंडांना मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा सेंट जॉर्ज रुग्णालयाजवळील सार्वजनिक शौचालयाजवळ सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले संशयित आरोपी महाराष्ट्राबाहेरील असून त्यांच्याकडून ३ अग्निशस्त्रे, मॅगझिन आणि ४५ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या शस्त्रांवर 'मेड इन चायना' असे लिहिलेले असून आंतरराज्यीय गुन्हेगारी टोळ्यांना ही शस्त्रे पुरवण्याचा त्यांचा डाव होता.

अटक करण्यात आलेल्या गुंडांमध्ये पंजाबमधील पतियाळा येथील रहिवासी २४ वर्षीय जशनप्रीत मंगल सिंग, २४ वर्षीय सुखविंदर सिंग आणि राजस्थानमधील झालावाड येथील रहिवासी असलेल्या अरबाजचा समावेश आहे. या सर्वांची पार्श्वभूमी अत्यंत गुन्हेगारी स्वरूपाची असून त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यातील दोघे जण २०२२ मधील एका खून प्रकरणापासून फरार होते, तर एकट्या अरबाजवर तब्बल १९ गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरातील स्थानिक गुन्हेगारांना शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणे हा या तस्करांचा मुख्य उद्देश होता.

एम. आर. ए. मार्ग पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या चिनी शस्त्रांचा देशातील मुख्य स्त्रोत काय आहे आणि ती कोणत्या मार्गाने मुंबईत पोहोचली, याचा शोध घेणे आता पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

लॉरेन्स बिश्नोई गँगशी कनेक्शन असल्याचा संशय

या बेकायदेशीर शस्त्र पुरवठा रॅकेटच्या मागे असलेली मोठी साखळी उघड करण्यासाठी पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. या आरोपींचे कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गंगशी काही कनेक्शन आहे का, तसेच ही शस्त्रे संघटित गुन्हेगारी टोळ्यांसाठी मागवलेल्या मोठ्या साठ्याचा भाग होती का, या दिशेने गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.

logo
marathi.freepressjournal.in