चिंतामणी राजाचे जल्लोषात आगमन; स्वागतासाठी भक्तांची गर्दी

चिंतामणीची मूर्ती बकरी अड्डा याठिकाणी प्रसिद्ध मूर्तिकार खातूंच्या कारखान्यात बनवली गेली आहे.
चिंतामणी राजाचे जल्लोषात आगमन; स्वागतासाठी भक्तांची गर्दी
Published on

विघ्नहर्त्या बाप्पाच्या स्वागतासाठी गणेशभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात बाप्पाचे आगमन जल्लोषात होत असून शनिवारी चिंचपोकळीच्या चिंतामणी राजाचे जल्लोषात आगमन झाले. दोन वर्षांनंतर गणेशोत्सवाची धूम असून चिंतामणीच्या स्वागतासाठी भक्तांची गर्दी झाली होती. चिंतामणीची मूर्ती बकरी अड्डा याठिकाणी प्रसिद्ध मूर्तिकार खातूंच्या कारखान्यात बनवली गेली आहे.

चिंचपोकळीचा चिंतामणी गणेशोत्सव मंडळाचे हे १०३ वे वर्ष आहे. दरवर्षी या गणेशाचे आगमन मोठ्या जल्लोषात होते. कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सवावर निर्बंध होते. हे निर्बंध हटल्याने यंदा धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जातो आहे. अवघ्या तीन दिवसांवर गणेशोत्सव आल्याने मंडळांच्या मंडपांत गेल्या सात दिवसांपासून आगमनाला सुरुवात झाली आहे. चिंतामणीच्या आगमनासाठी चिंचपोकळी ते लागबाग, कॉटनग्रीनचे रस्ते गणेशभक्तांनी फुलून गेले होते. सकाळपासूनच मुंबईभरातून गणेशभक्त येण्यास सुरुवात झाली. दुपारी आगमन मिरवणूक निघाली तेव्हा अलोट गर्दी झाली.

मुंबईतील लालबाग, चिंचपोकळी हा भाग गणेशभक्तांसाठी पंढरी मानला जातो. दरवर्षी याठिकाणी लाखो गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी पोहचत असतो. यंदाही मोठी गर्दी झाली. आगमनाच्या मिरवणुकीला आलेल्या भक्त जणांनी येथील स्थानिकांच्या वाहनांवर चढून आगमन सोहळ्यात सहभाग घेतला. त्यामुळे कारखान्याच्या बाजूला असलेल्या काही वाहनाचे नुकसान झाले आहे. या वाहनांची बोनेट्स, बम्पर, पुढच्या काचा, दरवाजाचे नुकसान झाल्याचे समोर आले. हळू हळू गर्दी वाढत गेली आणि चेंगरा चेंगरी झाली. यात एकजण गुदरमरून जखमी झाल्याचे समोर आले. गर्दी लक्षात घेऊन मंडळांनी आरोग्य सेवाही उपलब्ध केली होती. त्यामुळे संबंधित जखमीला तत्काळ बाजूला काढून उपचार करण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in