शिरीष पवार/मुंबई
सार्वजनिक गणेशोत्सवाचा निम्म्याहून अधिक म्हणजे ६० टक्के निधी हा शुद्ध लोककल्याणकारी योजनांवर खर्च करून मुंबईतील मंडळांना समाजसेवेचा आदर्श घालून देणारा चिंचपोकळीचा चिंतामणी यंदा १०५ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. विशेष म्हणजे यंदा चिंतामणी हा श्रीकृष्णाच्या रूपात आणि बंधू बलराम, भगिनी सुभद्रा यांच्या सोबतीने जगन्नाथ पुरीच्या प्रभावळीसह भक्तांना दर्शन देणार आहे. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ म्हणजेच चिंचपोकळीच्या चिंतामणीची स्थापना ही १९२० मध्ये झाली. हे गिरणगावातील सगळ्यात जुने गणेशोत्सव मंडळ. लोकमान्य टिळकांपासून प्रेरणा घेत मंडळाच्या सामाजिक कार्याचा श्रीगणेशा झाला. सार्वजनिक उत्सवात एकत्र आलेल्या लक्षावधी हातांनी समाजसेवेचा जगन्नाथाचा रथ अविरतपणे ओढणारे चिंचपोकळीचे हे मंडळ यंदा जगन्नाथ पुरीच्या देखाव्यासह चिंतामणीचे श्रीकृष्ण रूपात दर्शन घडवित आहे.
याबाबत मंडळाचे पदाधिकारी संदीप परब यांनी सांगितले की, ओरिसास्थित भगवान जगन्नाथ हे संपूर्ण भारताचे इष्ट दैवत म्हणून पुजले जाते. यंदा चिंतामणी हा श्रीकृष्ण अवतारात विराजमान होत आहे. स्टुडिओ विजय खातूच्या मूर्तिकार रेश्मा खातू यांच्या संकल्पनेतून चिंतामणी साकार झाला आहे. मूर्तीची उंची १८ फूट आहे. तसेच प्रभावळ देखील श्रीकृष्णाचा अवतार भगवान जगन्नाथ तसेच सोबत सुभद्रा तसेच बलराम अशा संकल्पनेत साकारली आहे. इंद्रदेवाने जगन्नाथ यात्रा सुकर व्हावी यासाठी हनुमंत आणि गरुड त्यांचे रक्षक-सेवक म्हणून रथासोबत नेमले आहेत.
मुंबईसह महाराष्ट्रभर आगमनाधीश अशी कीर्ती पसरलेला चिंचपोकळीचा चिंतामणी हा यंदा श्रीकृष्ण अवतारात जगन्नाथ पुरीच्या देखाव्यात अवतरणार असल्याने भाविकांमध्ये त्याची प्रचंड उत्सुकता आहे. यंदाची ही जगन्नाथ पुरीची कलात्मक भव्यदिव्य सजावट येथील प्रमुख आकर्षण ठरणार आहे. यावर्षी मंडळाचे अध्यक्ष विठ्ठलदास पै, मानद सचिव वासुदेव गजानन सावंत आणि कोषाध्यक्ष विकास सावंत हे मंडळाची धुरा सांभाळत आहेत.
लोकसेवेचा रथ
चिंचपोकळीच्या चिंतामणीचा ६० टक्के निधी हा समाजसेवेवर, तर उर्वरित ४० टक्के निधी हा गणेशोत्सवासह नवरात्रौत्सव आणि शिवजयंती यांसारख्या उत्सवावर खर्च होतो.
केवळ गणेशोत्सव, नवरात्रौत्सव या धार्मिक उत्सवांपुरतेच मर्यादित न राहता मंडळाचे वाचनालय, सुसज्ज ग्रंथालय, संदर्भ ग्रंथालय, आरोग्य दवाखाना तसेच माफक दरात इंग्रजी सुसज्ज किलबिल नर्सरी, रुग्ण साहित्य केंद्र असे विविध उपक्रम वर्षभर राबविले जातात.
मंडळाच्या वतीने दरवर्षी मुंबईतील एका आदिवासी पाड्यावर जाऊन आरोग्य शिबीर घेतले जाते. तसेच गरीब गरजू लोकांना औषधे तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जाते.
मंडळ दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळक यांच्या एक ऑगस्ट या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करते. यावर्षी ७८८ जणांनी रक्तदान केले.