चुनाभट्टी रेल्वे उड्डाणपुलाचा मुहूर्त पुन्हा लांबणीवर; आराखड्याची IIT मुंबईकडून फेरतपासणी

चुनाभट्टी रेल्वे फाटकावरील वाहतूक कोंडी व लोकलच्या वेळापत्रकावर होणारा परिणाम टाळण्यासाठी प्रस्तावित रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला पुन्हा विलंब होण्याची चिन्हे आहेत.
चुनाभट्टी रेल्वे उड्डाणपुलाचा मुहूर्त पुन्हा लांबणीवर; आराखड्याची IIT मुंबईकडून फेरतपासणी
चुनाभट्टी रेल्वे उड्डाणपुलाचा मुहूर्त पुन्हा लांबणीवर; आराखड्याची IIT मुंबईकडून फेरतपासणी X|@Dev_Fadnavis
Published on: 

मुंबई : चुनाभट्टी रेल्वे फाटकावरील वाहतूक कोंडी व लोकलच्या वेळापत्रकावर होणारा परिणाम टाळण्यासाठी प्रस्तावित रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला पुन्हा विलंब होण्याची चिन्हे आहेत.

पुलाचे बांधकाम सुरू होण्यापूर्वी त्याच्या आराखड्याची फेरतपासणी आयआयटी मुंबईकडून करण्यात येणार आहे. या प्रस्तावाला बुधवारी स्थायी समितीने मंजुरी दिली. मात्र, या फेरतपासणीसाठी २४ महिन्यांचा कालावधी प्रस्तावित असल्याने प्रत्यक्ष बांधकामाला आणखी किती प्रतीक्षा करावी लागणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. चुनाभट्टी रेल्वे फाटक बंद करून उड्डाणपूल उभारण्याचा मुहूर्त पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील दिवा, तर हार्बर मार्गावरील कुर्ला, चुनाभट्टी आणि शिवडी येथील रेल्वे फाटकांमुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. रेल्वे गाड्यांच्या येण्या-जाण्याच्या वेळेनुसार ही फाटके दिवसातून अनेकदा बंद आणि उघड केली जातात. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागतात, परिसरात वाहतूक कोंडी होते आणि काही वेळा लोकलच्या वेळापत्रकावरही परिणाम होतो. विशेषतः सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी प्रवाशांना विलंबाचा सामना करावा लागतो.

ही समस्या दूर करण्यासाठी चुनाभट्टी रेल्वे फाटक बंद करून त्या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय महापालिकेच्या पूल विभागाने रेल्वेच्या सहकार्याने घेतला. मात्र, निविदा प्रक्रिया आणि त्यानंतरच्या तांत्रिक प्रक्रियांमध्ये वेळ गेल्याने अद्याप प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झालेली नाही.

३७.४१ कोटींचा खर्च वाढून ४१.७७ कोटींवर

उड्डाणपुलासाठी महापालिकेने ऑक्टोबर २०२४ मध्ये निविदा मागवल्या होत्या. या निविदा प्रक्रियेत पाच कंपन्यांनी सहभाग घेतला. प्रकल्पासाठी सुरुवातीला ३७ कोटी ४१ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता. मात्र, निविदा मंजुरीच्या टप्प्यापर्यंत हा खर्च वाढून ४१ कोटी ७७ लाख रुपयांवर पोहोचला.

पुन्हा तपासणी करण्याचा निर्णय

पुलाच्या आराखड्यासाठी मे. टेक्नोजेम कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार पुलाच्या ठिकाणी सर्वेक्षण, मातीच्या थरांची तपासणी आणि अन्य तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून संरचनात्मक आराखडे तयार करण्यात आले. तरीही प्रत्यक्ष बांधकाम सुरू होण्यापूर्वी आराखड्याची पुन्हा तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे उड्डाणपुलाचे काम कधी सुरु होणार आणि कधी पूर्ण होणार, याची प्रतीक्षा आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in