राज्यसभेच्या निवडणुकीत चुरस निर्माण

निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडी आणि भाजपमधील संघर्ष अधिक टिपेला पोहोचला
 राज्यसभेच्या निवडणुकीत चुरस निर्माण

पहिल्या पाच जागांचे निकाल अपेक्षित असले तरी सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीचे संजय पवार आणि भाजपच्या धनंजय महाडिक यांच्यात जोरदार संघर्ष असणार आहे. त्यातच आता राष्ट्रवादीच्या अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानासाठी हजर राहण्याची अनुमती न्यायालयाने नाकारल्याने मतांचा कोटा ४२ वरून ४१ वर आला आहे. उद्या कोणी आमदार अनुपस्थित राहिले किंवा काही मते अवैध ठरली तर हा कोटा आणखीनही खाली जाऊ शकतो. त्यामुळे पारडे कुठेही झुकण्याची शक्यता वाढणार आहे.

भाजपने तिसरा उमेदवार रिंगणात उतरविल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. तब्बल २४ वर्षांनंतर राज्यसभेसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडी आणि भाजपमधील संघर्ष अधिक टिपेला पोहोचला आहे. आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्व सूत्रे हाती घेतली आहेत. तर भाजपच्या वतीने विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सक्रिय आहेत. त्यांचा कोरोना अहवालही आता निगेटिव्ह आला आहे.

राज्यसभेच्या सहा जागांसाठी विधानसभेतील २८७ आमदार मतदानासाठी पात्र आहेत. पहिल्या फेरीत निवडून येण्यासाठी ४२ मतांचा कोटा आवश्यक आहे; मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाची अनुमती न्यायालयाने नाकारली आहे. मतदानापर्यंत हीच परिस्थिती कायम राहिली तर ४२ चा कोटा ४१ वर येईल. एकूणच प्रत्यक्ष मतदान होऊन वैध मतांवर विजयी उमेदवाराचा कोटा निश्चित होईल. मतदारांना पहिल्या पसंतीचे मत देणे बंधनकारक आहे. पहिल्या पसंतीचे मत नसेल तर मतपत्रिका अवैध ठरेल. पहिल्या पसंतीनंतर मतदाराला दुसऱ्या, तिसऱ्या पसंतीची मते देता येतील. पसंतीच्या मतांवर सहाव्या उमेदवाराचे भवितव्य ठरणार असल्याने आमदारांना मतदानाची तांत्रिक प्रक्रिया समजावून दिली जात आहे.

मतदान खुल्या पद्धतीने होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या आमदारांना मतदान करण्यापूर्वी आपली मतपत्रिका पक्षाने नेमून दिलेल्या प्रतिनिधीला दाखवावी लागेल. अपक्ष आमदारांना मतपत्रिका दाखवणे बंधनकारक नाही.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in