
मुंबई : ‘दादा, टॅक्सी पारसी बावडी के इधर रुकाना...’ असे चर्चगेटला जाणारे प्रवासी सहजपणे म्हणतात. या भागातून रोज लाखो प्रवासी प्रवास करतात. ते रोज पारसी बावडी बघतात. या तुमच्या, आमच्या पारसी बावडीने शुक्रवारी ३०० वर्षे पूर्ण केली. ही पारसी बावडी ‘भिका बेहराम विहीर’ म्हणूनही ओळखली जाते.
तहानलेल्या प्रवाशांना गोडे पाणी मिळावे म्हणून भिका बेहराम पांडे या व्यापाऱ्याने १७२५ मध्ये दक्षिण मुंबईत विहीर बांधली. या भागातून जाणाऱ्या शेकडो मुंबईकरांना त्याचा फायदा झाला. जवळपास तीन शतके ही विहीर सुस्थितीत राखणे ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे.
पारसी धर्मीयांची भिका बेहराम विहीर ही महत्त्वाची पुरातत्त्व वास्तू (हेरिटेज) आहे. ही विहीर मुंबईतील पारशी लोकांसाठी एक पवित्र जागा आहे. ही शहरातील सर्वात जुनी गोड पाण्याची विहीर आहे. तिची बांधणी १७२५ मध्ये भिकाजी बेहराम पांडे यांनी केली. हे भिकाजी पांडे एक व्यापारी होते. तहानलेल्या प्रवाशांच्या आणि स्थानिकांच्या दुर्दशेने ते प्रभावित झाले होते. त्यामुळे नागरिकांना पाण्याचा पुरवठा करेल, अशी विहीर खोदण्याचे काम त्यांनी हाती घेतले.
ही विहीर पारशी लोकांची असल्याने सध्या विहिरीच्या छताच्या आवारात फक्त पारशी लोकच जाऊ शकतात, परंतु मागील बाजूस असलेल्या नळांद्वारे उपलब्ध असलेले विहिरीचे पाणी सर्व समुदायांना वापरता येते.
जनतेला पाणी पुरवण्याचे काम ३०० वर्षांनंतरही सुरू आहे. या विहिरीला ३०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शुक्रवारी पारसी धर्मीयांनी ‘जशन’ हा धार्मिक समारंभ येथे आयोजित केला. शनिवारी, ‘अवा रोज’ हा सण आहे. तो दिवस पाण्यासाठी संरक्षक देवदूताला समर्पित दिवस आहे, त्या दिवशी विहिरीजवळ प्रार्थना होईल.
शुक्रवारी इराणी नववर्ष किंवा जमशेदी नवरोजच्या त्रिशतकी सोहळ्यात बच्ची करकरिया यांनी संपादित केलेल्या 'वॉटरनामा : मुंबईच्या भिखा बेहराम विहिरीचे ३०० वर्षे' या स्मारक खंडाचे प्रकाशनही करण्यात आले.
ज्येष्ठ पत्रकार नौसेर भरुचा यांनी सांगितले की, भिका बेहराम विहीर केवळ शहरातील पुरातत्त्व वास्तू नाही तर पारशी लोकांसाठी धार्मिक जागा आहे. पारशी लोक येथे येऊन प्रार्थना करतात. विहिरीजवळून जाणारे इतर धर्माचे अनेक लोक श्रद्धेने नतमस्तक होतात. कारण त्यांचा असा विश्वास आहे की विहीर वरदान देते, असे भरूचा म्हणाले.
महाराष्ट्र विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी मुंबई मनपा आयुक्तांना पत्र लिहून ही विहीर ज्या चौकात आहे, त्याचे नामकरण ‘भिखा बेहराम चौक’ असे करावे, अशी मागणी केली आहे.