
मुंबई : स्वातंत्र्य दिनी सार्वजनिक सुट्टी असल्याने लाखो मुंबईकर फिरण्यासाठी दक्षिण मुंबईत थडकले होते. आपल्या मुलांना घेऊन गेटवे ऑफ इंडिया, नरिमन पॉइंट, म्हातारीचा बूट येथे जाण्यासाठी ते निघाले. पण, सार्वजनिक वाहतूक सेवेची उपलब्धता घटल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. बस, टॅक्सी मिळत नसल्याने अनेकांना पायपीट करावी लागल्याचे दिसत होते.
१५ ऑगस्टला सुट्टी असल्याने मुंबई, ठाण्यातील नागरिकांनी फिरायला दक्षिण मुंबई गाठली. गेटवे ऑफ इंडिया, नरिमन पॉइंट ही नागरिकांच्या आवडीची ठिकाणे. ती पहायला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर बस पकडायला एकच गर्दी होती. बसची संख्या घटल्याने नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. टॅक्सीचालकांनीही याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला.
बेस्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, १५ ऑगस्टला बेस्टने रविवारचे वेळापत्रक वापरले. १०० पैकी ८० बसेस धावत होत्या. बसच नव्हे, तर टॅक्सींची संख्या कमी होती. प्रवासी सीएसएमटी, मरीन ड्राईव्ह, गिरगाव, हाजीअली, गेटवे येथे मोठ्या संख्येने निघाले होते. बस पुरेशा नसल्याने प्रवाशांची बस स्टॉपवर मोठी गर्दी होती. याचा मोठा फटका महिला व ज्येष्ठ नागरिकांना बसला. तास तासभर नागरिकांना बसची वाट पाहावी लागत होती. त्यामुळे जास्त भाडे देऊन नागरिकांना टॅक्सी करावी लागत होती.
सीएसएमटी येथे महिला प्रवाशाने सांगितले की, मी ३५ मिनिटे बससाठी उभी होते. मात्र, मला ती मिळाली नाही. १५ ऑगस्ट रोजी अनेक चालकांनी सुट्टी घेतल्याने टॅक्सीही मिळत नव्हती. ५० टक्के टॅक्सीचालकांनी रजा घेतली होती, असे राम मिलन यादव या टॅक्सीचालकाने सांगितले.
सुट्टीच्या दिवशी सर्वंकष वाहतूक धोरण राबवा
सार्वजनिक वाहतूक नसल्याचा मोठा फटका ज्येष्ठ नागरिकांना बसला. टॅक्सी मिळत नसल्याने त्यांचा संताप अनावर झाला होता. सरकारने सुट्टीच्या दिवशी सर्वंकष वाहतूक धोरण राबवावे, अशी मागणी त्यांनी केली. सुट्टीच्या दिवशी महिला प्रवाशांची कुचंबणा झाली. कारण बस भरलेल्या होत्या. त्यामुळे बसायला जागाही मिळत नव्हती. वाहतूक प्राधिकरणांनी तातडीने याबाबत हस्तक्षेप करून सुट्टीच्या दिवसाचे नियोजन व समन्वय साधावा, अशी मागणी त्यांनी केली.
स्वातंत्र्य दिवस व प्रजासत्ताक दिनानिमित्त सार्वजनिक वाहतुकीची नितांत गरज असते. नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून सर्वंकष वाहतूक धोरण आखायला हवे, अशी मागणी माजी बँक कर्मचारी आशिष चव्हाण यांनी केली.