

मुंबई: कॉकरोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनाची धग महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, नाशिक, पुण्यासह प्रमुख शहरांपर्यंत पोहोचलेली दिसली. मुंबईच्या दादर येथे चैत्यभूमी परिसरात विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा प्रयत्न केला, तर पुणे आणि नागपुरातही विद्यार्थ्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. मुंबईत दादर येथील चैत्यभूमी परिसरात आंदोलनाला परवानगी नसल्याचे सांगत पोलिसांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचे दिसून आले. तर काही ठिकाणी विद्यार्थिनी आणि महिलांना ताब्यात घेण्यात आले.
आम्ही केवळ सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांना पाठिंबा देण्यासाठी आणि निषेध व्यक्त करण्यासाठी इथे शांततेत जमलो आहोत. आम्हाला शांततेत निषेध व्यक्त करायचा आहे, असे आंदोलक पोलिसांना सांगत होते. पण मुंबईत जमावबंदीचा आदेश लागू आहे. त्यामुळे आंदोलन करण्यास मनाई आहे, असे सांगत पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. यावेळी संतप्त आंदोलक माध्यमांसमोर भूमिका मांडू लागले. घोषणाबाजी करु लागल्यामुळे परिसरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली.
शिवाजी पार्क परिसरात विद्यार्थ्यांना घेतले ताब्यात
विशेष म्हणजे चैत्यभूमी जवळ असणाऱ्या शिवाजी पार्क परिसरातही विद्यार्थी मोठ्या प्रमाणात जमलेले होते. त्यांना सु्द्धा पोलिसांनी ताब्यात घेतले. ‘आम्ही फक्त उभे आहोत. घोषणाबाजी केली नाही. कुणाचे नावही घेतललेले नाही. तरी आम्हाला का ताब्यात घेतले जात आहे?’, असे सवाल काही विद्यार्थ्यांनी केले. दरम्यान, चैत्यभूमीवर आज आंदोलन आयोजित करणाऱ्यांना पोलिसांनी याआधीच नोटीस बजावत ताब्यात घेतले होते. तरीही अनेक विद्यार्थी आंदोलनासाठी जमले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस दाखल होते.
ठाकरे सेनेनेही दिलेली आंदोलनाची हाक
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून रविवारी चैत्यभूमीवर आंदोलनाची हाक देण्यात आली होती. त्यावेळीदेखील पोलिसांकडून कारवाई करण्यात आली होती. आंदोलन आयोजित केल्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पुण्यातही आक्रमक आंदोलन
केवळ मुंबईतच नव्हे तर पुण्यातही विद्यार्थ्यांकडून आंदोलनाची हाक देण्यात आली होती. पुण्यातील प्रसिद्ध भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी कॉलेज परिसरात आक्रमक आंदोलन पुकारले. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली. शिक्षण व्यवस्थेतील अपयश आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी होणारा खेळ थांबवण्यासाठी शिक्षणमंत्र्यांनी तत्काळ पद सोडावे, अशी आक्रमक मागणी विद्यार्थ्यांनी केली.
नागपुरातही केंद्र सरकारविरोधात निदर्शने
नागपुरातही विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत आंदोलन केले. सोमवारी संविधान चौकात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांनी एकत्र येत केंद्र सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली आणि परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता व विश्वासार्हता निर्माण करण्याची मागणी केली. संविधान चौकातून आंदोलनात विद्यार्थ्यांनी हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शहीद भगतसिंग यांची छायाचित्रे तसेच विविध मागण्यांचे फलक घेतले होते. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण पद्धतीने आपला निषेध नोंदवला.