

मुंबई : 'नीट' परीक्षेतील गैरव्यवहारांविरुद्ध दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलनाचे रान उठवून तत्कालीन शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा देण्यास भाग पाडणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) आता आपला मोर्चा मुख्य निवडणूक आयुक्तांकडे (सीईसी) वळविला आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशभरात आंदोलन पुकारण्याचा तसेच ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस दिल्लीतील जंतरमंतर येथे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके यांनी गुरुवारी येथे दिला.
दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विद्यार्थ्यांवर किंबहुना आंदोलकांवर लाठीचार्ज करून चूक केली. ती चूक महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करू नये. प्रशासनाने आंदोलन करण्याची परवानगी दिली असो वा नसो शुक्रवारी शिवाजी पार्कवर आम्ही आंदोलन करणारच आहोत, असा निर्धारही दीपके यांनी व्यक्त केला. ते मुंबई प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
आंदोलन आपोआप मोठे होईल
दीपके म्हणाले की, गेल्या १२ वर्षांपासून लोक घाबरले होते. मात्र, आता लोक घाबरत नाहीत, लोक घराघरातून आंदोलनाला येतील. फडणवीस यांनी शहा यांच्यासारखी चूक करू नये, आमच्यावर लाठीचार्ज झाल्याने आंदोलन मोठे झाले. जर त्यांना अटक करायची असेल तर आत्ताच या, आम्हाला अटक करा, आमचे आंदोलन आपोआप मोठे होईल. मतदार यादीतील विशेष सखोल पुनरिक्षणाची (एसआयआर) प्रक्रिया थांबवावी, एसआयआर यादी रद्द करावी, २०२५ च्या मतदार यादीच्या आधारेच निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी सीजेपीने केली आहे. निवडणूक आयोगाची भूमिका पारदर्शक असावी, अशी आमची मागणी असल्याचे ते म्हणाले.
हुकूमशाही सुरू
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची भारतामध्ये हुकूमशाही सुरू आहे, मोदी आणि शहा हे निवडणूक आयुक्ताची निवड करू शकत नाहीत. ज्ञानेश कुमार यांनी स्वतः राजीनामा द्यावा. ते देशाचे गद्दार आहेत, असा गंभीर आरोप दिपके यांनी केला.
सीजेपीच्या मागण्या
ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, त्यांना कोणी आदेश दिले होते, हे त्यांनीच स्पष्ट करावे, एसआयआर प्रक्रिया स्थगित करून जानेवारी २०२५ ची मतदार यादी पूर्ववत करावी, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, २०२३ चा नियुक्तीविषयक कायदा रद्द करावा, नागरी समाजाच्या सहभागासह एक पारदर्शक कायदा करावा, अशा सीजेपीच्या मागण्या आहेत.