मुंबई : मुंबईत कमी वेळेत जादा पाऊस झाला असला, तरी पालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे मुंबईची तुंबई झाली. नालेसफाईसाठी सुमारे ३०० कोटी, तर खड्डे बुजवण्यासाठी २८० कोटी रुपयांचा खर्च, तरी पावसाळ्यात मुंबई जलमय आणि खड्डेमय याला पालिकेचा ढिसाळ कारभार आणि कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी हा खटाटोप, असा आरोप माजी नगरसेवकांनी केला आहे.
रस्त्यांची कामे रखडल्याचा फटका मुंबईला बसला आहे. रस्ते कामे नियोजित वेळेत पूर्ण झाली नाहीत, रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणाची घोषणा झाली, मात्र या कामासाठी कंत्राटदार मिळेनात, अशी परिस्थिती निर्माण झाली. पाच वेळा निविदा काढाव्या लागल्या. त्यामुळे रस्ते कामाचे नियोजन फसले आहे. नालेसफाईच्या कामात कंत्राटदारांनी योग्य प्रकारे कामे केली नाहीत, असा आरोप विरोधी आणि सत्ताधारी पक्षांकडून केला जात होता. दोन दिवस झालेल्या पावसाने नालेसफाईचे पोलखोल झाले.
मेट्रोच्या कामामुळे नाले आणि रस्ते तोडून ठेवले आहेत. त्यामुळे अनेक भागांत पाणी भरले. त्यावर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे. मेट्रोमुळे होत असलेल्या नुकसानीचा खर्च मेट्रोकडून वसूल करण्यात यावा, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे.