तहसील कार्यालयाच्या बाहेरच दोन भावांमध्ये हाणामारी

जखमी तरुणाला कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल
तहसील कार्यालयाच्या बाहेरच दोन भावांमध्ये हाणामारी

कर्जत : कर्जत तहसील कार्यालयाच्या बाहेरच दोन भावांमध्ये झालेल्या हाणामारीत एकाच्या पोटात चाकू खुपसल्याची घटना कर्जतमध्ये घडली आहे. जागेच्या वादातून सुरू झालेल्या या हाणामारीचे पडसाद थेट जीवघेण्यापर्यंत पोहचले होते. जखमी तरुणाला कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आरोपी व त्याच्या आईला कर्जत पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला आहे.

कर्जत तालुक्यात सध्या जमिनीच्या वादाचे अनेक प्रकरण समोर येत असताना सोमवारी तहसीलदार कार्यालयात झालेल्या तारखेनंतर फाटकासमोरच उभे असलेले रणजीत करताडे यांचे कोषाणे येथील मावस भाऊ विशाल शरद दाभणे व त्याची आई नीता शरद दाभणे यांच्यात किरकोळ वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्यातच विशाल दाभणे याने त्याच्याजवळ असणारे धारदार शस्त्र रणजित करताडे यांच्या खांद्यावर, हातावर तसेच पोटात खुपसले. या घटनेत विशाल दाभणे यांची आई नीता दाभणे यांनी मुलाला मारहाण करण्यास प्रोत्साहन दिल्याचे जखमीकडून सांगण्यात आले.

जखमी रणजीत करताडे यांनी कर्जत पोलीस ठाणे गाठले, तर येथील उपस्थित पोलिसांनी प्रथम करताडे यांना कर्जत उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवले. कर्जत पोलिसांनी विशाल शरद दाभणे व आई नीता शरद दाभणे या दोघांना अटक केली आहे. हा हल्ला जागेचे हिस्से फोड करण्याच्या वादातून झाला असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे हे दोघे मावस भाऊ असल्याचे बोलले जात आहे.

सदर घटनेचा तपास कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस करीत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in