नाशिक-मुंबई महामार्गावर उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे. मुंबईतील शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी महिला कार्यकर्त्या बसमधून प्रवास करत होत्या. यावेळी तेथून जात असलेल्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी महिलांना विचित्र हावभाव केल्याचा आरोप करत काहींना चोप दिला. कसारा ते शहापूर दरम्यान ही घटना घडली. या दोन गटातील वाद आता मिटला असून कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत.
उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर तर एकनाथ शिंदे गटाचा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहे. त्यासाठी दोन्ही ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली असून मोठ्या संख्येने कार्यकर्ते मुंबईत दाखल होत आहेत. सभेच्या काही तास आधीपासून शिवाजी पार्क आणि बीकेसी मैदानावर कार्यकर्ते जमू लागले आहेत. नेत्यांनी शक्तिप्रदर्शनासाठी राज्यभरातील कार्यकर्त्यांना मुंबईत बोलावले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुंबईत 20 हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
विश्वास नांगरे पाटील यांनीही याबाबत सविस्तर नियोजन केल्याचे सांगितले. अपघातांपासून संरक्षण तसेच प्रत्येक जंक्शनवर SRPF 'स्ट्रायकिंग' पथके, 'डेल्टा' पथके, अवजड वाहने आणि अतिरिक्त स्थानिक पोलिस दल तैनात करण्यात आले आहे.