मुंबई : रस्त्यावर कचरा फेकणारे, थुंकणारे, घाण करणाऱ्यांवर क्लीन-अप मार्शलनी दंडात्मक कारवाई करत दोन आठवड्यात २ लाख ९६ हजार ५१३ रुपयांचा दंड वसूल केला आहे. घाण करणाऱ्यांना शिस्त लावणे हा मुख्य उद्देश असून सध्या सहा वॉर्डात क्लीन-अप मार्शलची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी घाण, अस्वच्छता करणाऱ्यांकडून २०० ते एक हजार रुपयांपर्यंत दंड वसूल केला जात आहे. मुंबईत तीन वर्षांनंतर २ एप्रिलपासून क्लीन-अप मार्शलची नियुक्ती करण्यात आली आहे. पालिकेच्या ए वॉर्डातून कारवाईला सुरुवात झाली असून पालिकेच्या सहा वॉर्डात सध्या क्लीन-अप मार्शल कारवाई करत आहेत. पालिकेच्या आयटी विभागाने ऑनलाइन अॅपद्वारे दंडात्मक रक्कम वसूल करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी क्लीन-अप मार्शलकडे मोबाईल ब्ल्यूटूथवर चालणारा छोटा प्रिंटर देण्यात आला आहे. या प्रिंटरद्वारे दंडाकरिता स्वतंत्र पावती छापून दिली जात आहे. दंडाची रक्कम ही क्लीन-अप मार्शल संस्थेच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे. दंडाची अर्धी रक्कम पालिका तर अर्धी रक्कम कंत्राटदाराला मिळणार आहे.
हे करू नका, अन्यथा कारवाई
उघड्यावर इतरत्र कचरा टाकणे - २०० रुपये
उघड्यावर थुंकणे - २०० रुपये
उघड्यावर स्नान करणे - १०० रुपये
दुकानाबाहेर कचऱ्याचा डबा न ठेवणे - ५०० रुपये
कचरा विभक्तीकरण न करणे - ५०० रुपये
प्राणी व पक्ष्यांना उघड्यावर खाऊ टाकणे - ५०० रुपये
धोकादायक कचरा निर्देशित न करणे - ५०० रुपये
अशी झाली कारवाई
ए वॉर्ड फोर्ट - १७७३१३ रुपये (८२० चलान)
सी वॉर्ड मुंबई सेंट्रल - ३९९०० रुपये ( ८६ चलान)
ई वॉर्ड भायखळा - १५०० रुपये (२४ चलान)
जी/एस वरळी - ७६४०० रुपये (२५८ चलान)
आर/सी बोरिवली - २०० रुपये (२ चलान)
के/ई अंधेरी पूर्व - १२०० रुपये (१३ चलान)