तीन वर्षांनंतर क्लीन-अप मार्शल ‘ऑन ड्युटी’, पालिकेच्या ए वॉर्डातून कारवाईची सुरुवात

कोरोना काळात तोंडावर मास्क न लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसाठी क्लीन-अप मार्शलची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यावेळी क्लीन-अप मार्शल कारवाईच्या नावाखाली पैसे उकळत असल्याच्या तक्रारी पालिका व महापौर कार्यालयात प्राप्त झाल्या होत्या.
तीन वर्षांनंतर क्लीन-अप मार्शल ‘ऑन ड्युटी’, पालिकेच्या ए वॉर्डातून कारवाईची सुरुवात

मुंबई : सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान, थुंकणे, रस्त्यावर कचरा फेकणे आता चांगलेच महागात पडणार आहे. मुंबईच्या रस्त्यांवर तब्बल तीन वर्षांनंतर क्लीन-अप मार्शल ‘ऑन ड्युटी’ तैनात करण्यात आले आहे. पालिकेच्या ए वॉर्डातून मंगळवार, २ एप्रिलपासून क्लीन-अप मार्शलनी सुरुवात केली असून बुधवारी सी वॉर्डात ते तैनात असणार आहेत.

कोरोना काळात तोंडावर मास्क न लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसाठी क्लीन-अप मार्शलची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यावेळी क्लीन-अप मार्शल कारवाईच्या नावाखाली पैसे उकळत असल्याच्या तक्रारी पालिका व महापौर कार्यालयात प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर क्लीन-अप मार्शल योजना बंद करण्यात आली होती. मात्र पुन्हा एकदा मुंबईच्या स्वच्छतेसाठी क्लीन-अप मार्शलची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, पालिकेच्या प्रत्येक वॉर्डात २५ ते ३० क्लीन-अप मार्शल तैनात करण्यात येणार असून मंगळवार, २ एप्रिलपासून पालिकेच्या ए वॉर्डातून कारवाईची सुरुवात झाली आहे.

ऑनलाईन पद्धतीनेही कारवाई!

रस्त्यांवर कचरा फेकणे, थुंकणे, घाण करणे यावर आता क्लीन-अप मार्शलचा वॉच असणार आहे. पालिकेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून कमीत कमी १०० रुपये तर जास्तीत जास्त १ हजार रुपये दंड आकारण्याचे अधिकार क्लीन-अप मार्शल यांना असणार आहे. सदर योजना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे साहेब यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या संकल्पनेतून ऑनलाईन पद्धतीने दंडात्मक कार्यवाही सुरू केली आहे.

ऑनलाईन दंडात्मक कारवाई! अरेरावीला लगाम!

पालिकेच्या आयटी विभागाने ऑनलाईन ॲप तयार केला आहे. यासाठी क्लीन-अप मार्शलकडे मोबाईल ब्लूटूथवर चालणारा छोटा प्रिंटर देण्यात आला आहे. या प्रिंटरद्वारे दंडासाठी स्वतंत्र पावती मिळणार आहे. यामुळे मार्शलकडून नागरिकाबरोबर कुठलीही अरेरावी करता येणार नाही. तसेच अन्य कोणत्याही छापील पावतीचा वापर करणे शक्य होणार नाही. त्याचप्रमाणे दंडाची रक्कम ही क्लीन-अप मार्शल संस्थेच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. यामुळे रोख पैशांचा व्यवहार होणार नसून कामांत पारदर्शकता येणार आहे.

मुंबईकरांनी सहकार्य करावे!

या योजनेमुळे मुंबईच्या स्वच्छतेमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी या योजनेला सहकार्य करतील, अशी अपेक्षा पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी व्यक्त केली.

logo
marathi.freepressjournal.in