रस्त्यावर कचरा फेकताय, हजार रुपये तयार ठेवा; मुंबईत पुन्हा सुरू झाली 'ही' योजना

पहिले आठ ते दहा दिवस दंडात्मक कारवाईची पावती देण्यात येणार असून त्यानंतर दंड वसुली ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे.
रस्त्यावर कचरा फेकताय, हजार रुपये तयार ठेवा; मुंबईत पुन्हा सुरू झाली 'ही' योजना

मुंबई : मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी मुंबई मनपाने यापूर्वी क्लीनअप मार्शल योजना सुरू केली होती. त्यानंतर ती बंद पडली. आता ही योजना पुन्हा सुरू होत असून उघड्यावर घाण, कचरा फेकणाऱ्यांवर ‘क्लीनअप’ मार्शलची नजर असणार आहे. पालिकेच्या वॉर्डात ‘क्लीनअप मार्शल’ची नियुक्ती केली आहे. रस्त्यावर थुंकणे, घाण फेकणे, कचरा फेकणाऱ्यांवर क्लीनअप मार्शल २०० रुपये ते एक हजारांपर्यंत दंड वसूल करणार आहेत.

पहिले आठ ते दहा दिवस दंडात्मक कारवाईची पावती देण्यात येणार असून त्यानंतर दंड वसुली ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. यासाठी ॲॅप विकसित करण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

कोरोना काळात तोंडावर मास्क न लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसाठी क्लीनअप मार्शल तैनात करण्यात आले होते. परंतु ‘क्लीनअप मार्शल’ बेकायदा दंड वसूल करत असल्याच्या तक्रारी पालिकेला प्राप्त झाल्यानंतर त्यांचे कंत्राट रद्द करण्यात आले होते. सध्या शहरात ‘क्लीनअप मार्शल’ नसल्याने रस्त्यांवर कचरा फेकणे, घाण करत असल्याचे मुंबई महापालिकेच्या निदर्शनास आले. त्यानंतर जनजागृती, अस्वच्छता रोखण्यासाठी मुंबईत सद्यस्थितीत ‘स्वच्छतादूत’ नेमण्यात आले आहेत. स्वच्छता मोहीम व्यापक स्थरावर राबवण्यासाठी ‘स्वच्छतादूत’ स्वच्छतेबाबत जनजागृती, प्रशासनाला माहिती देऊन स्वच्छतेचे काम करणे, सोसायट्यांमध्ये कचरा वर्गीकरणाबाबत नजर ठेवणे, अशी कामे केली जात आहेत.

परंतु पुन्हा एकदा अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर लक्ष ठेवत दंडात्मक कारवाईसाठी ‘क्लीनअप मार्शल’ तैनात केले. सद्यस्थितीत क्लीनअप मार्शल ‘स्वच्छतादूतां’सोबत काम करणार असून आठ दिवसांत अस्वच्छता करणाऱ्यांकडून दंड वसुली सुरू केली जाणार आहे.

प्रदूषण करणाऱ्यांना पाच ते दहा हजारांचा दंड!

सद्यस्थितीत प्रत्येक वॉर्डात प्रत्येकी २५ ते ३० ‘क्लीनअप’ मार्शल नेमण्यात येणार आहेत.आगामी काळात क्लीनअप मार्शलना प्रदूषणाचे नियम मोडणाऱ्यांवरही करावाई करण्याचे अधिकार देण्याचा विचार पालिका करीत आहे. यामध्ये पाच ते दहा हजारांचा दंड वसूल केला जाऊ शकतो.

वाद टाळण्यासाठी ऑनलाईन दंड वसुली!

दोन वर्षांच्या कोरोना काळात ‘क्लीनअप मार्शल’नी विनामास्क फिरणाऱ्या ४० लाख जणांवर कारवाई करून ८० कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. मात्र ‘क्लीनअप मार्शल’कडून दंड वसूल करताना काही वेळा नियम मोडणाऱ्यांमध्ये वादावादीचे प्रसंग घडले.

logo
marathi.freepressjournal.in