गणेशमूर्ती विसर्जनासाठी तलावांची साफसफाई; मुलुंडमधील तीन तलावांच्या स्वच्छतेसाठी ९८ लाखांचा खर्च

लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबापुरीत आतापासून लगबग सुरू झाली आहे. तर बाप्पाच्या स्वागतासह विसर्जन निर्विघ्न पार पडावे यासाठी, मुंबई महापालिका सज्ज झाली आहे.
गणेशमूर्ती विसर्जनासाठी तलावांची साफसफाई; मुलुंडमधील तीन तलावांच्या स्वच्छतेसाठी ९८ लाखांचा खर्च

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबापुरीत आतापासून लगबग सुरू झाली आहे. तर बाप्पाच्या स्वागतासह विसर्जन निर्विघ्न पार पडावे यासाठी, मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. मुंबईत ठिकठिकाणी बाप्पाचे विसर्जन होते. गणेशमूर्ती विसर्जनासाठी तलावातील गाळ उपसा करणे, साफसफाई करणे आदी कामे हाती घेण्यात येणार आहेत. मुलुंड पूर्वेकडील मोरया, गणेश घाट व भोईर तलावातील गाळ उपसा करणे साफसफाई करणे यासाठी पालिका तब्बल ९८ लाख १३ हजार ७२० रुपये खर्च करणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व घराघरात ७ सप्टेंबर रोजी लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. देशविदेशात बाप्पाच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येते. देशात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. परंतु मुंबईत गणेशोत्सवाची धूम वेगळीच असते. गणेशोत्सवात १० दिवस मुंबापुरी उजळून निघते. लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा, असे आवाहन पालिकेच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने केले जाते. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी शाडूच्या मातीच्या गणेशमूर्ती साकारणाऱ्या मूर्तीकारांना यंदाही मोफत शाडूची माती उपलब्ध करण्यात येणार आहे.

बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबई महापालिकेकडून तयारी सुरू असताना विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची निर्मिती करणे, नैसर्गिक तलावातील गाळ उपसा करणे, साफसफाई करणे आदी कामे हाती घेण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुलुंड पूर्वेकडील मोरया तलाव, गणेश घाट तलाव व भोईर तलावातील गाळ उपसा करणे साफसफाईचे काम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी पालिकेने निविदा प्रक्रिया राबवली असून पात्र कंत्राटदाराला काम देण्यात येणार आहे. या तिन्ही तलावांच्या स्वच्छतेसाठी पालिका ९८ लाख १३ हजार रुपये खर्च करणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in