प्रत्येक विभागातील तीन मंदिरांत स्वच्छता मोहीम; मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार कार्यवाही सुरू

पालिकेच्या प्रत्येक परिमंडळातील एका प्रशासकीय विभागात (वॉर्ड) दर आठवड्यात एक दिवस संपूर्ण स्वच्छ‍ता मोहीम राबविण्यात येत आहे.
प्रत्येक विभागातील तीन मंदिरांत स्वच्छता मोहीम; मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार कार्यवाही सुरू

मुंबई : मुंबईतील मंदिर परिसरांत २२ जानेवारीपर्यंत लोकसहभाग आणि श्रमदानातून सखोल स्वच्छता मोहीम (डीप क्लीन ड्राईव्ह) राबविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या स्वच्छता मोहिमेत नागरिकांनी सहभागी होऊन श्रमदान करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

“२२ जानेवारी २०२४ पर्यंत दररोज पालिका कार्यक्षेत्रातील मंदिरांच्या परिसरात सखोल स्वच्छता मोहीम राबविली जाणारी आहे. प्रत्येक प्रशासकीय विभागातील किमान तीन प्रमुख मंदिरांची स्थानिक पातळीवर निवड केली जाणार आहे. परिमंडळ सहआयुक्त, उपआयुक्त, सहायक आयुक्त यांना याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत. मंदिर स्वच्छता मोहिमेत मुंबईकर नागरिकांनी सहभागी व्हावे आणि श्रमदान करावे,” असे आवाहन अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी यानिमित्त केले आहे.

पालिकेच्या प्रत्येक परिमंडळातील एका प्रशासकीय विभागात (वॉर्ड) दर आठवड्यात एक दिवस संपूर्ण स्वच्छ‍ता मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी एकनाथ शिंदे हे स्वत: दर आठवड्यास मोहिमेत सक्रिय सहभाग घेतात. पालिकेने संपूर्ण स्वच्छता मोहीमेसाठी ६१ मुद्यांचा समावेश असलेली प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) निश्चित केली आहे. पालिका राबवत असलेली संपूर्ण स्वच्छता मोहीम आता राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिका तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात ‘महास्वच्छता अभियान’ स्वरूपात राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

सखोल स्वच्छता मोहिमेचा भाग म्हणून मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील मंदिरांची स्वच्छता आणि रोषणाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी मुंबईतील मंदिर परिसर स्वच्छतेकामी सखोल स्वच्छता मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in