ठाणे: राज्यातील सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता करा, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंदिराच्या साफसफाईंची सुरुवात शनिवारी ठाण्यातील प्राचीन असलेल्या कौपिनेश्वर मंदिरापासून केली. मुख्यमंत्री यांनी स्वत: हातात झाडू घेवून व तद्नंतर पाण्याने मंदिरच्या सभामंडपाची तसेच परिसराची साफसफाई केली. तसेच २२ जानेवारी रोजी अयोध्येमध्ये होणाऱ्या राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका हद्दीतील सर्व मंदिरे साफ करून मंदिराना विद्युत रोषणाई करण्याच्या सूचनाही त्यांनी आयुक्त अभिजीत बांगर यांना दिल्या. तसेच टप्याटप्याने राज्यातील सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम हाती घेणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
ठाणे महानगरपालिकेच्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेत अंतर्गत नौपाडा-कोपरी प्रभाग समितीतील सर्व विभागांमध्ये स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेत आमदार संजय केळकर, माजी महापौर नरेश म्हस्के, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, संजय वाघुले, परिवहन सभापती विलास जोशी, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, आदी सहभागी झाले होते.
या मोहिमेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभाग घेवून ठाणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ऐतिहासिक अशा कौपिनेश्वर मंदिरापासून मंदिराच्या साफसफाईला सुरुवात केली. मुंबई ठाणे परिसरात सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविल्यामुळे मुंबई ठाण्यातील प्रदुषणाचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच केंद्र सरकारने राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते महाराष्ट्राला स्वच्छतेतील प्रथम क्रमांक देवून गौरविले आहे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.
ठाणे महापालिकेच्या नौपाडा कोपरी प्रभागसमिती अंतर्गत कोळीवाडा परिसरातील अष्टविनायक चौक ते सिडको बोगदा, स्वामी समर्थ मठ परिसर ते मंगला हायस्कूल परिसर, राऊत शाळा परिसर, कोपरी भाजी मार्केट व ठाणेकरवाडी परिसर, सिद्धाथनगर मेन रोड, बारा बंगला परिसर, कोपरी गांव कन्हैय्या नगर रोड, आनंदनगर/ गांधीनगर, मेंटल हॉस्पिटल परिसर, भास्कर कॉलनी, एलबीएस रोड भक्ती मंदिर परिसर, नौपाडा पोलीस स्टेशन ते भास्कर कॉलनी ब्रीज, राम मारुती रोड, गोखले रोड, मासुंदा तलाव परिसर, ठाणे स्टेशन पूर्व व पश्चिम परिसर, पोलीस लाईन, खारटन रोड, सिडको, एस.टी स्टॅण्ड ते महागिरी, जांभळी नाका मार्केट परिसर, बिम्स नाला, रेल्वे नाला, जाफरशेठ नाला, वंदना नाला, आयटीआय ठाणेकरवाडी आदी परिसरात ही सर्वंकष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. सर्व प्रथम रस्त्यावर झाडू मारुन ते स्वच्छ करणे, फूटपाथ तसेच रस्त्याच्या मधील दुभाजक स्क्रबरने घासून ते पाण्याने स्वच्छ करणे अशा पध्दतीने प्रभागसमितीतील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते स्वच्छ करण्यात आले.
स्वच्छतेबाबत लोकचळवळ निर्माण करा
मुंबई ठाण्यातील सर्वंकष स्वच्छता मोहिमेमध्ये सफाई कर्मचाऱ्यांबरोबरच महापालिकेचे अधिकारी कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिक, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक सहभागी होत असून ही मोहीम न राहता ती लोकचळवळ निर्माण करावयाची असल्याने या मोहिमेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.