वरळीची मुख्यमंत्र्यांकडून सफाई स्वच्छता पॅटर्न यशस्वी, राज्यातील शहरातही मोहीम -मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वरळीत रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरळीत ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली.
वरळीची मुख्यमंत्र्यांकडून सफाई स्वच्छता पॅटर्न यशस्वी, राज्यातील शहरातही मोहीम -मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

मुंबई : ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वरळीत रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरळीत ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली. संपूर्ण स्‍वच्‍छता मोहीम अर्थात डीप क्लिनिंग ड्राइव्ह सुरू केली आहे. पालिकेचा स्‍वच्‍छता पॅटर्न यशस्‍वी होत असून, हा पॅटर्न राज्यातील सर्व शहरांमध्ये राबविला जाईल, अशी घोषणा राज्याचे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मुंबईतील रस्‍ते सिमेंट काँक्रिटकरणाचे होत असल्याने खड्डेमुक्त रस्ते होतील, त्या दिशेने कामे सुरू आहेत, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

पालिकेच्‍या तीन वॉर्डांमध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वच्छता मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग घेतला. परिमंडळ २ मध्‍ये जी दक्षिण आणि एफ दक्षिण, परिमंडळ १ मध्‍ये ई विभागातील मोहिमेत सहभाग नोंदवत स्वच्छतेच्या कामांची त्यांनी पाहणी केली. अॅनी बेझंट मार्गावरील डॉ. हेडगेवार चौकात स्वच्छतेची पाहणी केली. वरळी नाका येथील आचार्य प्रल्‍हाद केशव अत्रे चौकातील रस्‍ता जेट स्प्रेच्या सहाय्याने पाणी फवारणी करुन स्वच्छ केला. आचार्य प्रल्‍हाद केशव अत्रे यांचा पुतळा, चौथ-याची देखील त्यांनी पाणी फवारणी करून स्‍चच्‍छता त्‍यांनी केली. डॉ. ई. मोझेस मार्गावरील जिजामाता नगर, माता रमाई चौक येथे स्‍वच्‍छतेची पाहणी करत महापालिका प्रशासनास आवश्यक त्या सूचनाही केल्‍या. 

रस्ते, पदपथ, सार्वजनिक भिंती यांच्यासह मुंबईतील बेस्ट बसेससाठी असणारे सर्व बस थांबे स्वच्छ करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. मुंबई सेंट्रल येथे राज्य परिवहन महामंडळाच्या मुख्य आगाराबाहेर सुरु असलेली पदपथ रंगरंगोटी, रस्ते स्वच्छता यांची देखील मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. स्थानिक नागरिकांना वाहतूक, वाहनतळ याविषयी भेडसावत असलेल्या समस्या जाणून घेतल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी थेट उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधत समस्यांचे निराकरण करण्याचे निर्देश दिले.

पर्यावरणपूरक वातावरण निर्मिती काळाची गरज! 

मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. देश – विदेशातूनच नव्‍हे तर जगभरातून लोक मुंबईत येतात. मुंबई जशी त्यांना अपेक्षित आहे, तशीच मुंबई साकारण्याचे शासनाचे ध्येय आहे. मुंबईत सुशोभीकरणाची कामे सुरू आहेत. रस्ते दुभाजकांमध्ये तसेच चौक, वाहतूक बेट आणि शक्य असेल त्या मोकळ्या जागांवर रोपं, झाडे लागवड करणे, हिरवळ फुलवणे, हरित पट्टे व नागरी वने तयार करून पर्यावरण पूरक वातावरण तयार करणे, अशा चौफेर पद्धतीने पालिकेच्या माध्यमातून कामकाज सुरू आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

logo
marathi.freepressjournal.in