आर्थिक वर्ष संपण्याआधी निविदांचा सपाटा; १० दिवसांत १५० कोटींच्या ९४० निविदा

मार्चअखेरीस आर्थिक वर्ष संपण्याआधी वॉर्ड स्तरावरील कामांसाठी निविदा मागवण्यात येत असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले
आर्थिक वर्ष संपण्याआधी निविदांचा सपाटा; १० दिवसांत १५० कोटींच्या ९४० निविदा

मुंबई : मार्चअखेर हे आर्थिक वर्ष संपण्याआधी मुंबई महापालिकेने वॉर्ड स्तरावरील कामांसाठी निविदांचा सपाटा लावला आहे. गेल्या १० दिवसांत १५० ते १६० कोटींच्या तब्बल ९४० निविदा मागवल्या असून यापैकी मालाड व कांदिवलीतील कामासाठी २९२ निविदा मागवल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

आर्थिक वर्षं संपण्याआधी वॉर्ड स्तरावरील पदपथ, झोपडपट्टीतील टॉयलेट बॉक्सची दुरुस्ती, उद्यानातील डागडुजी अशा विविध कामांसाठी गेल्या १० दिवसांत १५० ते १६० कोटींच्या ९४० निविदा मागवल्या असून एका निविदा प्रक्रियेत १५ ते १८ कोटींची कामे होणार आहेत. चालू आर्थिक वर्षात कामे पूर्ण होणार नसली तरी निविदा प्रक्रिया राबवत त्या कामांना मंजुरी मिळणे अपेक्षित आहे. प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर पुढील आर्थिक वर्षात ही कामे करण्यात काही हरकत नसते. त्यामुळे आर्थिक वर्ष संपण्याआधी निविदा मागवण्यात आल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

दरवर्षी मार्चअखेर अर्थात आर्थिक वर्ष संपण्याआधी निविदा मागवण्यात येतात. परंतु आगामी निवडणुका लक्षात घेता निविदांमध्ये काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असते. आचारसंहिता लागू होण्याआधी आपल्या प्रभागातील कामांना सुरुवात व्हावी, अशी अपेक्षा स्थानिक लोकप्रतिनिधींची असते. त्यामुळे मार्चअखेरीस आर्थिक वर्ष संपण्याआधी वॉर्ड स्तरावरील कामांसाठी निविदा मागवण्यात येत असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

२५ वॉर्डसाठी प्रतीवॉर्ड ६ कोटींच्या निविदा - आयुक्त

मार्चअखेर आर्थिक वर्ष संपण्याआधी वॉर्ड स्तरावरील कामांसाठी निविदा मागवण्यात येतात. प्रती वॉर्डची लोकसंख्या ५ ते ७ लाखांच्या घरात असून २५ वॉर्डसाठी प्रतीवॉर्ड ६ कोटींच्या निविदा मागवण्यात आल्या असून प्रभागातील पदपथ, पर्जन्य जलवाहिनी, मलनि:सारण वाहिन्या, शौचालयांची दुरुस्ती अशा विविध कामांसाठी निविदा मागवण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बाल सिंग चहल यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in