
राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनेकदा विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना या प्रश्नावरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. अशामध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. या या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकार आता प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देणार आहे. २०० रुपये अनुदानाची शिफारस करण्यात आली होती, पण आपण ३०० रुपये देण्याचा निर्णय घेतला," अशी घोषणा त्यांनी केली. ते पुढे म्हणाले की, "कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून देशाच्या कांदा उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर आहे. यामध्ये ४३ टक्के वाटा हा आपल्या राज्याचा आहे." अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
ते म्हणाले की, "बाजारामध्ये लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर आहे. देशातील इतर राज्यातील कांद्याचे उत्पादन वाढल्यामुळे पुरवठ्याच्या प्रमाणात मागणी कमी आहे. यामुळे कांद्याच्या दरामध्ये घसरण झाली आहे. त्याला मिळणारा भाव कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील जिव्हाळ्याचा भाग आहे," असे मत त्यांनी व्यक्त केले.