
काल रत्नागिरीच्या (Ratnagiri) खेडमध्ये (Khed) ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप, शिंदे गटासह निवडणूक आयोगावर टीका केली. यावेळी, "देशद्रोही म्हणालात तर जीभ हासडून हातात देऊ," असा इशारा त्यांनी दिला. यासर्व टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उत्तर दिले असून ते म्हणाले की, "उद्धव ठाकरेंचा रोजचा थयथयाट सुरु असून त्यांनी फक्त आता जागा बदलेली आहे. त्यांना आरोप-प्रत्यारोप केल्याशिवाय चैन पडत नाही. त्यांनी आरोप करावेत, आम्ही त्यांना कामातून उत्तर देऊ," असे म्हणत उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
पुढे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, "अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना देशभक्ताची उपमा द्यायलाही ते मागेपुढे पाहणार नाहीत. आमच्या सरकारचा विकास पाहून त्यांना पोटदुखी झाली आहे. त्यावर इलाज करण्यासाठी आम्ही बाळासाहेब ठाकरे रूग्णालय उभारले आहेत." अशी टीका त्यांनी केली. तसेच, "उद्धव ठाकरेंचे जीभ हासडून टाकू, हे विधान हास्यास्पद आहे. रोज उठसूट शिव्या-शाप देणे, आरोप करणे, तपास यंत्रणा, पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्याविरुद्ध खालच्या पातळीवर बोलणे, असे प्रकार रोज सुरू आहेत. कालच्या सभेत स्वातंत्रसैनिकांबातही त्यांनी भाष्य केले. पण स्वतः सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले. बाळासाहेब ठाकरेंनी हे कधीच केले नव्हते. त्यांनी बाळासाहेबांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार २०१९ला गमावला आहे." असा टोलादेखील लगावला.