विरोधकांच्या टीकेनंतर आता 'वर्षा' आणि 'सागर' बंगल्याच्या खर्चाला चाप; आता किती येणार खर्च?

महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनात विरोधकांनी वर्षा आणि सागर बंगल्यामध्ये खानपानाच्या होणाऱ्या खर्चावर आक्षेप घेत शिंदे - फडणवीस सरकारवर टीका केली होती.
विरोधकांच्या टीकेनंतर आता 'वर्षा' आणि 'सागर' बंगल्याच्या खर्चाला चाप; आता किती येणार खर्च?

अगदी काही दिवसांपूर्वी झालेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' आणि उपमुख्यमंत्र्यांच्या 'सागर' बंगल्यामध्ये होणाऱ्या खानपानाच्या खर्चावर विरोधकांनी आक्षेप घेतला होता. यानंतर आज शिंदे - फडणवीस सरकारने हा खर्च आटोक्यात आणण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही बंगल्याचे कंत्राट आता २ वेगवेगळ्या खाजगी कंत्राटदारांना देण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'वर्षा' तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' या बंगल्यांवर छत्रधारी कॅटरर्स आणि सुखसागर हॉस्पिटॅलिटीची २ वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. या दोन्ही बंगल्यावर खानपानासाठी अंदाजे खर्च अनुक्रमे ३.५० कोटी आणि १.५० कोटी इतका असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवारांनी खानपानावर सरकारकडून होणाऱ्या खर्चावर जोरदार टीका केली होती. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर ४ महिन्याचे जेवणाचे बील २ कोटी ३८ लाख आले होते. यावेळी अजित पवारांनी, 'सरकार चहामध्ये सोन्याचा अर्क टाकतात का?' असा खोचक सवाल केला होता.

नव्या नियमांनुसार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पाहुण्यांसाठी 'साधारण' आणि 'विशेष' पदार्थांची यादी तयार करण्यात आली आहे. वेफर्ससाठी आता १० रुपये मिळणार आहेत, तर मसाला चहा, कॉफी व ग्रीन टीसाठी आता १४ रुपये आणि मसाला दुधासाठी १५ रुपये मोजावे लागणार आहेत. साधारण पदार्थांमध्ये शाकाहारी बफेटसाठी १६० रुपये, तर मांसाहारीसाठी १७५ रुपये आकारले जाणार आहेत. तसेच, विशेष पदार्थांमध्ये स्पेशल शाकाहारी बफेट ३२५ रुपयांना तर मांसाहारी बफेट ३५० रुपये आकारले जाणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in