अखेर गड सर! मावळाने केले दुसऱ्या बोगद्याचे काम फत्ते; नोव्हेंबरपर्यंत कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ब्रेक थ्रू
अखेर गड सर! मावळाने केले दुसऱ्या बोगद्याचे काम फत्ते; नोव्हेंबरपर्यंत कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत

गिरीश चित्रे/मुंबई
मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या कोस्टल रोड प्रकल्पातील दुसऱ्या बोगद्याचे काम मंगळवारी फत्ते झाले. दुसऱ्या बोगद्याचे काम ९ एप्रिल २०२२ रोजी सुरू झाले होते. चार मजली इमारती ऐवढी उंची असणाऱ्या टनेल बोरिंग मशीनने (मावळा) दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण करत गड सर केला आहे. या प्रकल्पामुळे मुंबईकरांचा प्रवास आरामदायी, आरोग्यदायी व वाहतूक कोंडी मुक्त असेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. कोस्टल रोड प्रकल्प वांदे येथे जोडल्यानंतर थेट रायगड जाण्याचा पर्याय उपलब्ध होईल, असेही शिंदे म्हणाले. कोस्टल रोड प्रकल्पातील दुसऱ्या बोगद्याचा ब्रेक थ्रू प्रियदर्शनी पार्क येथे मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. दरम्यान, मरीन लाइन्स ते वरळी दरम्यान कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत आणण्याचे नियोजन असल्याचे मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितले.

मुंबई महापालिका आयुक्त व प्रशासक डॉ. इक्बालसिंह चहल यांचा महत्वकांक्षी कोस्टल रोड प्रकल्प मुंबईची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्या नेतृत्वाखाली कोस्टल रोडचे काम जलदगतीने सुरू आहे. या प्रकल्पातील पहिल्या बोगद्याचे काम जानेवारी २०२१ मध्ये सुरू झाले आणि १० जानेवारी २०२२ मध्ये पूर्ण झाले. तर दुसऱ्या बोगद्याचे काम ९ एप्रिल २०२२ रोजी सुरू झाले आणि मंगळवार, २९ मे रोजी फत्ते झाले. या प्रकल्पामुळे मुंबईच्या पायाभूत सुविधांमध्ये एक महत्वपूर्ण अशी भर पडल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी यावेळी सांगितले.

प्रियदर्शनी पार्क येथे टिबीएम यंत्राने खोदाईचा हा अखेरचा टप्पा पूर्ण करून बोगदा पूर्ण करताच, याठिकाणी काम करणाऱ्या अभियंते, अधिकारी, कर्मचारी-कामगारांनी एकच जल्लोष केला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी मुंबई महापालिका आणि प्रकल्प अंमलबजावणीची जबाबदारी असलेल्या कंपन्या, सल्लागार तसेच अभियंते, कर्मचारी-कामगारांचे अभिनंदन केले. हे काम आव्हानात्मक होते. ते पूर्ण झाल्याने आपण सर्व या महत्वपूर्ण क्षणाचे साक्षीदार ठरल्याचे कौतुकोद्गारही शिंदे यांनी यावेळी काढले.

या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी स्थानिक कोळीवाड्यातील भुमिपुत्रांनाही विश्वासात घेतले आहे. समुद्रातील दोन खांबामधील अंतरही १२० मीटर्सचे केले आहे. पर्यावरणीय अशा सर्व गोष्टींची काळजी घेतली आहे. मुंबईत असे महत्वाचे अनेक प्रकल्प सुरू असून त्यांना केंद्राकडून विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवर्जून पाठबळ दिले आहे. मुंबईची वाहतूक कोंडीतून मुक्तता व्हावी, नागरिकांना दिलासा मिळेल, यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

देशातील पहिलाच बोगदा
मुंबईसाठी हा अत्यंत महत्वाचा प्रकल्प आहे. देशातील अशा प्रकारचा पहिलाच बोगदा पूर्ण केला आहे. या प्रकल्पातील आणि बोगदा पूर्ण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. समुद्राखालून जाणाऱ्या रस्त्यांसाठी विविध सुविधाही अत्याधुनिक असतील.

८ हजार कोटी बांधकामांत खर्च
मुंबईची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या कोस्टल रोड प्रकल्पाच्या बांधकामासाठी २२ हजार ७२१ कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. यांपैकी ८ हजार ४२९ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.

मुंबई ते रायगड जलद प्रवास शक्य - मुख्यमंत्री
मुंबई किनारी रस्ता प्रकल्पामुळे अंतर्गत पुढील टप्प्यात दहिसर- मिरा भाइंदरची कनेक्टिव्हिटी तयार होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना एकूण ३२ किलोमीटरचा सागरी किनारी मार्गाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. मुंबई पारबंदर प्रकल्पालाही या किनारी मार्गाची जोड दिल्याने वांद्रे येथून थेट रायगडला जाण्याचा पर्याय मिळणार आहे. परिणामी मुंबईतील वाहतूककोंडी दूर होत जलद गतीने प्रवासाचा अनुभव येणार आहे.

कोस्टल रोड प्रकल्पाची वैशिष्ट्ये

- रस्त्याची लांबी : १०.५८ किमी
- मार्गिका संख्या : ८ (४+४), (बोगद्यांमध्ये ३+३)
- भराव टाकून बनविलेल्या रस्त्यांची लांबी : ४.३५ किमी
- पुलांची एकूण लांबी : २.१९ किमी
- बोगद्यांची लांबी - प्रत्येकी २.०७ किमी, ११ मीटर अंतर्गत व्यास
- भारतात प्रथमच सकार्डो वायुविजन प्रणालीची व्यवस्था
- आपत्कालीन उपाययोजना म्हणून प्रत्येक ३०० मीटरवर छेद बोगद्यांची व्यवस्था
- उपयोगिता सेवेसाठी बोगद्यामध्ये युटीलिटी बॉक्स
- भूमिगत वाहनतळ : ०४, एकूण वाहनसंख्या : १,८५६

logo
marathi.freepressjournal.in