कोस्टल रोड बोगद्यात पहिला अपघात; टोयाटो गाडी भिंतीला घासली; गाडीतील दोघेही सुखरूप

प्रवाशांच्या पसंतीस उतरलेल्या कोस्टल रोडवर गुरुवारी पहिला अपघात झाल्याची घटना घडली आहे. चारचाकी टोयाटो गाडी भिंतीला घासल्याने गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परंतु सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कोस्टल रोड बोगद्यात पहिला अपघात; टोयाटो गाडी भिंतीला घासली; गाडीतील दोघेही सुखरूप

मुंबई : मुंबई महापालिकेचा महत्त्वपूर्ण प्रकल्प असलेल्या कोस्टल रोड प्रकल्पातील दक्षिण मुंबईतील वरळी ते मरीन ड्राईव्हदरम्यान तीन लेन १२ मार्चपासून प्रवासी सेवेत दाखल झाली. आतापर्यंत दीड लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला असून प्रवाशांच्या पसंतीस उतरलेल्या कोस्टल रोडवर गुरुवारी पहिला अपघात झाल्याची घटना घडली आहे. चारचाकी टोयाटो गाडी भिंतीला घासल्याने गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परंतु सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

कोस्टल रोडवर गिरगाव व मरीन ड्राईव्हदरम्यान दुपारी साडे बाराच्या सुमारास एक काळ्या रंगाच्या चारचाकी गाडीने बोगद्याच्या भिंतीला धडक दिली. अपघातानंतर तेथील वाहतुकीवर परिणाम झाला. वाहने संथ गतीने पुढे जात होती, असे प्रियदर्शनी पार्क येथील नियंत्रण कक्षातून तपासणीत निदर्शनास आले. त्यावेळी तेथील सीपी-५ ठिकाणी वाहनाचा अपघात झाल्याचे दिसून आले. त्यानुसार तत्काळ टोईंग व्हॅन घटनास्थळी पाठवण्यात आली. दुपारी १२.४६ वाजता टोईंग व्हॅन घटनास्थळी दाखल झाली. तसेच घटनास्थळावरील वाहतुकही नियंत्रित करण्यात आली. पाहणीत चालक व त्याच्या मागे बसलेल्या व्यक्तीला कोणतीही दुखापत झाली नसल्याचे दिसून आले.

चालकाच्या म्हणण्यानुसार, स्टेअरिंगमधील तांत्रिक अडचणीमुळे वाहन भिंतीला धडकले. टोईंग व्हॅनच्या मदतीने दुपारी दीडच्या सुमारास मोटरगाडी बोगद्यातून बाहेर काढण्यात आली. त्यानंतर बोगद्यातील वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली. या अपघातात मोटर गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. तेथे सांडलेल्या तेलामुळे अपघात होऊ नये, म्हणून महापालिकेकडून तत्काळ त्याची सफाई करण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in