कोस्टल रोडचे दोन्ही बोगदे होणार वॉटरप्रूफ; 'या' तारखेपासून पूर्ण क्षमतेने खुला होणार मार्ग : मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पात पाणीगळती सुरू झाल्याने या कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.
कोस्टल रोडचे दोन्ही बोगदे होणार वॉटरप्रूफ; 'या' तारखेपासून पूर्ण क्षमतेने खुला होणार मार्ग : मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई : मुंबई महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पात पाणीगळती सुरू झाल्याने या कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेत तातडीने पाहणी केली. कोस्टल रोडच्या दोन्ही बोगद्यातील गळती रोखण्यात आली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत पॉलिमर ग्राऊंटिग इंजेक्शनद्वारे एक्स्पान्शन जोडण्यात आला. तसेच दोन्ही बोगद्यातील ५० एक्स्पान्शन पॉलिमर ग्राऊंटिग इंजेक्शनद्वारे जोडण्याचे काम सुरू असून दोन्ही बोगद्यातून पाणी गळती होणार नाही, याची खबरदारी घेतल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

पॉलिमर ग्राऊंटिग इंजेक्शनद्वारे एक्स्पान्शन जोडल्याने दोन्ही बोगदे वॉटरप्रूफ होतील, असे ते म्हणाले. दरम्यान, याच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत रस्त्यावर पडलेल्या भेगा बुजवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी उपस्थित होते.

कोस्टल रोडचे काम ऑक्टोबर २०१८ मध्ये सुरू झाले. २०१८ ते २० या कालावधीत कोस्टल रोडच्या कामाला वेग आला. मात्र मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला आणि मुंबईला ब्रेक लागला. कोरोनाचा फटका कोस्टल रोडला बसला. परंतु २०२२ मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आणि कामाला पुन्हा गती मिळाली. कोस्टल रोडचे ८६ टक्के काम पूर्ण झाले आणि वरळी ते मरीन ड्राईव्हदरम्यान एक लेन वाहतुकीसाठी अंशत: खुली करण्यात आली. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत ११ मार्च २०२४ रोजी एक मार्गिका खुली करण्यात आली. वरळी ते मरीन ड्राईव्हदरम्यान एक लेन प्रवाशांसाठी १२ मार्चपासून सेवेत आली आणि काही दिवसांत बोगद्यात चारचाकी गाडीला अपघात झाला. तर आता पावसाळा तोंडावर येऊन ठेपला असताना कोस्टल रोडच्या बोगद्यातून गळती होत असल्याचे निदर्शनास आले. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ दुरुस्तीचे आदेश देत मंगळवारी दुपारी स्वत: कोस्टल रोडच्या कामाची पहाणी केली.

१० जूनपासून पूर्ण क्षमतेने मार्ग खुला

कोस्टल रोड प्रकल्प वरळी येथे ४.५ किमीच्या वांद्रे-वरळी सी-लिंक महाकाय दोन गर्डरनी जोडण्यात आला आहे. हे मार्ग जोडल्यानंतर रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यामुळे मरीन ड्राइव्ह ते वांद्रे असा पाऊण तासाचा प्रवास अवघ्या १२ मिनिटांत करता येणार आहे. पुढील काही दिवसांत जोडलेल्या गर्डरच्या ठिकाणाचे काम पूर्ण झाल्यानंतर १० जून रोजी कोस्टल रोड पूर्ण क्षमतेने सुरू होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भेटीदरम्यान सांगितले.

वाहतुकीवर परिणाम नाही

कोस्टल रोडच्या बांधकामात २.०७२ किमीचे दोन महाकाय बोगदे जमिनीखाली ७० मीटर खाली खोदण्यात आले आहेत. यामध्ये जोडकामाच्या सांध्यांमध्ये गळती झाल्याचे समोर आले आहे. मात्र या पॉलिमर ग्राऊंटिग इंजेक्शन दिल्यामुळे दोन्ही ठिकाणची गळती आणि तीन ठिकाणी झिरपणारे पाणी बंद झाले आहे.

९० टक्के काम पूर्ण!

पालिकेच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱ्या ‘धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज’ सागरी मार्गाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले असून एकूण ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पात प्रिन्सेस स्ट्रिट फ्लायओव्हर ते वरळी सी-लिंक असा १०.५८ किमी लांबीचा कोस्टल रोड बांधण्यात आला आहे. तब्बल १४ हजार कोटी रुपये खर्च करून कोस्टल रोड बांधण्यात येत आहे.

रखडपट्टीची चौकशी करणार -आदित्य ठाकरे

महाविकास आघाडीचे सरकार असते तर संपूर्ण कोस्टल रोड डिसेंबर २०२३ पर्यंत सुरू झाला असता. मात्र निवडणुकीच्या तोंडावर श्रेय घेण्यासाठी काम अर्धवट असताना कोस्टल रोडची एक लेन घाईघाईने सुरू करण्यात आली. भ्रष्ट राजवटीने आमचे सरकार पाडल्यानंतर कामाचा वेग मुद्दाम कमी केला आणि खर्च वाढवला, असा घणाघाती आरोप शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला आहे. त्यामुळे आमचे सरकार आल्यानंतर कोस्टल रोडच्या रखडलेल्या कामाची चौकशी करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in