मुंबई : मुंबईतील किनारी रस्ता (कोस्टल रोड) आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाचे वरळीकडील टोक यांना जोडणारा पूल गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या पाहणीनंतर खुला झाला आहे. शुक्रवार, १३ सप्टेंबरपासून आठवड्यात सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस सकाळी ७ ते रात्री ११ दरम्यान हा पूल उत्तर दिशेच्या एकेरी वाहतुकीसाठी सर्वसामान्य वाहनधारकांना खुला करण्यात आला आहे.
धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्पांतर्गत उत्तरवाहिनी मार्गिकेकरिता किनारी रस्ता आणि सागरी सेतूला जोडणारा पूल दिनांक १५ सप्टेंबर २०२४ रोजी नागरिकांना उपलब्ध करून देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र, बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुदतीपूर्व दोन दिवस अगोदरच हा पूल नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करून दिला, हे कौतुकास्पद आहे.
यामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी दूर होणार आहे. त्याचबरोबर वेळेची, इंधनाची बचत होणार असून, ध्वनी प्रदूषण व वायू प्रदूषणातही घट होणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केले.
पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) अंतर्गत उत्तरवाहिनी मार्गिका आणि वांद्रे - वरळी सागरी सेतू यांना जोडणाऱ्या पुलामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर, सुसह्य आणि वेगवान होणार आहे. वाहतूक कोंडीतून सुटका होऊन नागरिकांना कुटुंबियांसमवेत अधिकचा वेळ देता येणार आहे. प्रवासाचा वेळ वाचल्याने कर्मचाऱ्यांची कार्यक्षमतादेखील वाढणार आहे. या पुलाची संरचना वैशिष्ट्यपूर्ण असून विदेशात आल्याचा भास होतो आहे, या शब्दांत त्यांनी प्रकल्पाचा गौरव केला.
प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे थेट प्रवास शक्य
या पुलामुळे शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट) ते वांद्रे असा उत्तर दिशेने थेट प्रवास करणे शक्य झाले आहे. शुक्रवार, दिनांक १३ सप्टेंबरपासून सकाळी ७ वाजेपासून उत्तर दिशेने एकेरी वाहतुकीसाठी हा पूल उपलब्ध होणार आहे. सदर पुलावरील वाहतूक ही दर आठवड्याला सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. तर, प्रकल्पाची उर्वरित कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने शनिवार व रविवार असे दोन दिवस वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाविषयी
एकूण १०.५८ किलोमीटर लांब असलेल्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पात भरणीवरील रस्ते, पूल, उन्नत रस्ते यांचा समावेश आहे. तसेच अमरसन्स, हाजी अली व वरळी येथे आंतरबदल मार्गिका अर्थात इंटरचेंज आहेत. तसेच दक्षिण-उत्तर मुंबईकडून येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहतुकीसाठी प्रत्येकी २ किलोमीटर लांबीचे दोन स्वतंत्र भूमिगत जुळे बोगदे करण्यात आले आहेत. या बोगद्यात सहा व इतर ठिकाणी ८ मार्गिका आहेत. या बोगद्यांना तब्बल ३७५ मिमी जाडीचे काँक्रिटचे अस्तर आहेत. या बोगद्यांमध्ये भारतात प्रथमच वापरात येत असलेली अत्याधुनिक सकार्डो ही वायूविजन प्रणाली आहे. आपत्कालीन उपाययोजना म्हणून दोन्ही बोगद्यांना जोडणारे एकंदर १० छेद बोगदेदेखील आहेत. तसेच या प्रकल्पातून ७० हेक्टर हरितक्षेत्र निर्मिती केली जात आहे.
दोन वर्षांत मुंबई खड्डेमुक्त - शिंदे
मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर असून देश-विदेशातून हजारो पर्यटक मुंबईत येतात. मुंबईच्या विकासात गतीने बदल घडत आहेत. पुढील दोन वर्षांत मुंबई महानगरातील सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे होणार असून त्यानंतर खड्डेमुक्त प्रवासाचा अनुभव मुंबईकर घेतील, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला.
महापालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा - फडणवीस
धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाची(दक्षिण) उभारणी उत्कृष्टरीत्या करून बृहन्मुंबई महापालिकेने शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. महापालिका प्रशासन त्यासाठी अभिनंदनास पात्र आहे. आजपर्यंत प्रकल्पाचे कामकाज ९२ टक्के पूर्ण झाले असून लवकरच उर्वरित कामे पूर्ण केली जातील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.