मुंबई : कोस्टल रोड अर्थात किनारा रस्त्याला वरळी - वांद्रे सागरी सेतूशी जोडणारा पूल गुरुवारी वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. त्यामुळे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हे अंतर अवघ्या बारा मिनिटांत कापता येईल.
सध्या रस्ते मार्गाने हे अंतर कापण्यास तासभर वेळ लागतो. गुरुवारी दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बिंदू माधव चौक येथे हिरवा झेंडा दाखवून हा जोड पूल वाहनांसाठी खुला केला जाणार आहे, असे समजते.
मुंबईतील वाहतूक कोंडी दूर करण्यात महत्वपूर्ण ठरणारा कोस्टल रोड हा वांद्रे - वरळी सागरी सेतूला जोडण्याचे काम पूर्ण झाल्याने या मार्गावरील प्रवास आता सुलभ होणार आहे. कोस्टल रोडचा सागरी सेतूला जोडणारा पूल वाहनांसाठी खुला होत असल्याने मरीन ड्राइव्हवरून थेट वांद्र्यापर्यंत १२ मिनिटांत पोहचता येणार आहे. शिवाय दक्षिण मुंबई, पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
महाकाय गर्डर
गर्डरची बांधणी रायगड जिल्ह्यातील न्हावा येथे करण्यात आली आहे. दोन हजार मेट्रिक टन वजनाचा महाकाय गर्डर जोडण्यात आला आहे. या मार्गाचे काम पूर्ण झाल्याने आता प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. या प्रकल्पामुळे लवकरच वाहचालकांना मरीन ड्राइव्हवरून थेट वांद्र्यापर्यंत जाता येणार आहे. यामध्ये मरीन ड्राइव्ह ते वांद्रे या ठिकाणी रस्ते मार्गाने जाण्यासाठी तास - सव्वातासा ऐवजी केवळ बारा मिनीटांत पोहचता येणार आहे.
वेळ व इंधनाची बचत
कोस्टल रोड सी-लिंकला वरळी येथे महाकाय गर्डरने जोडला गेल्याने वांद्र्याहून दक्षिण मुंबईत प्रवास करता येणार आहे. यामुळे येथील रोजची होणारी वाहतूक कोंडी कमी होणार आहे. तसेच मुंबईच्या दक्षिण टोकापासून वरळी सी लिंकपर्यंत सिग्नलमुक्त, करमुक्त वेगवान प्रवास करता येणार आहे. या प्रकल्पामुळे ७० टक्के वेळ आणि ३४ टक्के इंधनाची बचत होणार आहे. शिवाय दक्षिण मुंबई, पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
९० टक्के काम पूर्ण
कोस्टल रोडचे आतापर्यंत ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम अंतिम टप्प्यात आहे. मरीन ड्राइव्ह ते हाजीअलीपर्यंत ६.२५ किमीचा मार्गही सुरू झाला आहे. तर आता याच सागरी मार्गाला पुढे असणारा ४.५ किमी लांबीचा वांद्रे वरळी सी लिंक जोडण्यात आला आहे. या प्रकल्पातील टप्पा असलेल्या १३६ मीटरच्या गर्डरने जोडण्यात आला आहे.