कोस्टल रोडचे लोकार्पण पुन्हा लांबले: पंतप्रधानांचा दौरा रद्द; एक लेन वाहतुकीस सज्ज

मुंबईची वाहतूककोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्पाचा शुभारंभ ऑक्टोबर २०१८ मध्ये झाला.
कोस्टल रोडचे लोकार्पण पुन्हा लांबले: पंतप्रधानांचा दौरा रद्द; एक लेन वाहतुकीस सज्ज

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वरळी ते मरीन ड्राईव्ह दरम्यान चार लेनच्या एका मार्गिकेचे लोकार्पण सोमवार १९ फेब्रुवारी रोजी होणार होते. परंतु मोदी यांचा दौरा रद्द झाल्याने लोकार्पण सोहळा पुढे ढकलण्यात आल्याने पहिल्या टप्प्यातील थडानी जंक्शन वरळी ते मरीन ड्राईव्ह दरम्यानची सफर हुकली. दरम्यान, चार लेनच्या एका मार्गिकेचे १०० टक्के काम पूर्ण झाले असून, एकूण प्रकल्पाचे ८६ टक्के काम पूर्ण झाले आहे.

मुंबईची वाहतूककोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्पाचा शुभारंभ ऑक्टोबर २०१८ मध्ये झाला. त्यानंतर मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला आणि कोस्टल रोड प्रकल्पाचा वेग मंदावला होता. परंतु २०२२ पासून कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामाला गती आली असून, सद्यस्थितीत ८६ टक्के काम पूर्ण झाले आहे. तर थडानी जंक्शन वरळी ते मरीन ड्राईव्ह दरम्यान, चार लेनच्या एक मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे १९ फेब्रुवारी रोजी मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार होते. परंतु मोदी यांचा दौरा रद्द झाल्याने लोकार्पण सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईत कोस्टल रोडची सफर करण्याचा मुहूर्त हुकला आहे.

कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणात तीन लेनची एकच बाजू सुरू करण्यात येणार आहे. यामुळे वरळीहून मरीन ड्राईव्ह येथे जाता येणार आहे. हा मार्ग सकाळी ८ ते रात्री ८ असा केवळ १२ तासच सुरू राहणार आहे.

पाऊण तासांचा प्रवास दहा मिनिटांत

भूमिगत पार्किंगमध्ये अमर सन्स येथे - २५६, महालक्ष्मी मंदिर व हाजी अली- १,२०० तर वरळी सी फेस येथे - ४०० वाहन क्षमता. मार्गावर वेग मर्यादा ताशी ८० ते १०० किमी.

याठिकाणी एक 'फुलपाखरु उद्यानासह उद्याने व मैदाने विकसित करण्यात येणार असून, लहानमुलांसाठी घसरगुंडी, सी-सॉ फळी, झोके यासारख्या बाबीही असणार आहेत.

बोगदे ‘न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग’ तंत्रज्ञानाने बनवण्यात आले असून, आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास प्रवासी आणि वाहने सुरक्षितरीत्या बाहेर काढता येणार आहेत.

कंट्रोल रूम, स्वयंचलित नियंत्रण आणि पोलीस यासारख्या सुरक्षा यंत्रणांशी हे बोगदे जोडलेले असणार आहे हा मार्ग वरळी सी लिंक जोडणार.

कोस्टल रोड प्रकल्पामुळे इंधनाची ३४ टक्के, तर वेळेची ७० टक्के बचत होणार आहे. दक्षिण मुंबईचा प्रवास ४५ मिनिटांचा प्रवास दहा मिनिटांत होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in