कोस्टल रोडची एक मार्गिका वाहतुकीसाठी सज्ज; ९६ टक्के काम पूर्ण, उद्घाटनाची प्रतीक्षा

मुंबईची वाहतूककोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
कोस्टल रोडची एक मार्गिका वाहतुकीसाठी सज्ज;
९६ टक्के काम पूर्ण, उद्घाटनाची प्रतीक्षा

मुंबई : मुंबईची वाहतूककोंडी फोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा कोस्टल रोड प्रकल्प पूर्ण सेवेत येण्यास मे महिना उजाडणार आहे. परंतु वरळी ते मरीन लाइन्सदरम्यान चार लेनची एक मार्गिका १९ फेब्रुवारीपासून सेवेत येणार आहे. या एका मार्गिकेचे ९६ टक्के काम पूर्ण झाले असून १९ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे. धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा असे कोस्टल रोडला नाव देण्यात आले आहे. दरम्यान, संपूर्ण कोस्टल रोड प्रकल्पाचे ८६ टक्के काम फत्ते झाले आहे.

मुंबईची वाहतूककोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये कोस्टल रोड प्रकल्पाची सुरुवात झाली. कोस्टल रोड प्रकल्पात एकूण १०.५८ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाचे बांधकाम प्रिन्सेस स्ट्रिट उड्डाणपूल ते राजीव गांधी सागरी सेतूच्या (वांद्रे- वरळी सीलिंक) दक्षिण टोकापर्यंत करण्यात येत आहे. कोस्टल रोड प्रकल्पात दोन बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. चार मजली इमारतीची उंची असणाऱ्या ‘मावळा’ टनेल बोअरिंग मशिनने २.०७२ किलोमीटरचे हे बोगदे खोदण्यात आले आहेत. सद्यस्थितीत ८६ टक्के काम फत्ते झाले असून १९ फेब्रुवारीला थडानी जंक्शन, वरळी ते मरीनलाइन्सदरम्यान एक मार्गिका वाहतुकीसाठी अंशत: खुली करण्यात येणार आहे.

कोस्टल रोड, गोरेगाव, मुलुंड लिंकचे भूमिपूजन!

गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार असून या प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १९ फेब्रुवारीला होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in