कोस्टल रोडचे काम फास्ट ट्रॅकवर: डेडलाईनमध्ये मार्गिका सुरू होणार; रात्रंदिवस कामाचा सपाटा चार हजार कामगार, ५०० अधिकारी तैनात

पालिकेच्या माध्यमातून प्रियदर्शनी पार्क ते वरळी सी-लिंक दरम्यान मुंबईला वेगवान बनवणारा महत्त्वाकांक्षी १०.५८ किमीचा कोस्टल रोड प्रकल्प बनवण्यात येत आहे.
कोस्टल रोडचे काम फास्ट ट्रॅकवर: डेडलाईनमध्ये मार्गिका सुरू होणार; रात्रंदिवस कामाचा सपाटा
चार हजार कामगार, ५०० अधिकारी तैनात

मुंबई : जानेवारी अखेरपर्यंत कोस्टल रोडची थंडानी जंक्शन वरळी ते मरीन लाईन्सपर्यंतचा काही भाग वाहतुकीसाठी खुला होणार, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे जानेवारी अखेरची डेडलाईन पाळण्यासाठी कोस्टल रोडचे काम जलद गतीने सुरू असून ४००० कामगार आणि ५०० अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. जानेवारी अखेरपर्यंत एक मार्गिका सुरू करण्यासाठी रात्रंदिवस कामाचा सपाटा लावला असून २४ तास काम सुरू आहे. यासाठी अद्ययावत १५० मशिनरीच्या सहाय्याने हे काम सुरू आहे.

पालिकेच्या माध्यमातून प्रियदर्शनी पार्क ते वरळी सी-लिंक दरम्यान मुंबईला वेगवान बनवणारा महत्त्वाकांक्षी १०.५८ किमीचा कोस्टल रोड प्रकल्प बनवण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे ३४ टक्के इंधनाची तर ७० टक्के वेळेची बचत होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प मुंबईकरांसाठी फायदेशीर आणि पर्यावरणस्नेही ठरणार आहे. ऑक्टोबर २०१८ पासून काम सुरू झालेल्या या प्रकल्पाचे काम नोव्हेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करून प्रकल्प मुंबईकरांच्या सेवेत आणण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र अद्याप सुमारे १५ टक्के काम बाकी असल्याने तयार झालेल्या मार्गापैकी वरळी ते मरीन लाइन्सपर्यंतचा ९.५ किमीचा मार्ग सुरू करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पूर्ण प्रकल्प आता मे २०२५ मध्येच मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे. सध्या एकूण १०.५८ किमी मार्गापैकी एका बाजूच्या चार लेन जानेवारी अखेरपासून सुरू होतील. पहिल्या टप्प्यात वरळी ते मरीन लाईन्सपर्यंतचा मार्ग सुरू करण्यासाठी वेगाने काम सुरू आहे. आतापर्यंत प्रकल्पाचे काम सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत सुमारे १५ तास करण्यात काम करण्यात येत होते. मात्र सद्यस्थितीत २४ तास हे काम करण्यात येत आहे.

...म्हणून खर्चात वाढ

एकूण १०.५८ किमीच्या कोस्टल रोड प्रकल्पात २ किमीचे दोन महाकाय बोगदे तयार करण्यात आले असून पहिल्या बोगद्याचे काम १० जानेवारी २०२२ ला पूर्ण झाले आहे, तर दुसऱ्या बोगद्याचे काम ३० मे रोजी पूर्ण झाले आहे.

कोस्टल रोडसाठी सुरुवातीला १२ हजार कोटींचे नियोजन करण्यात आले. मात्र प्रकल्प रखडल्यामुळे प्रकल्पाचा खर्च ७२१ कोटींनी वाढला आहे, तर चार सल्लागारांवर दरमहा होणारा अडीच कोटी खर्च प्रकल्प रखडल्याने किमान १५ कोटींनी वाढला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in