कोस्टल रोड वरळी ते वांद्रे सी-लिंक थेट प्रवास

गर्डर जोडणीनंतर वरळी येथून कोस्टल रोड सी-लिंकला जोडला जाणार आहे. त्यामुळे वाहनांना सध्या सी लिंक वरळीला जिथे संपतो तिथे वाहतूककोंडीचा सामना करावा लागणार नाही.
कोस्टल रोड वरळी ते वांद्रे सी-लिंक थेट प्रवास

मुंबई : प्रियदर्शनी पार्क ते वरळी आणि वरळी ते वांद्रे सी लिंक थेट प्रवास लवकरच करता येणार आहे. वरळी वांद्रे सी लिंकला १३६ मीटर लांब जोडण्यासाठी दोन हजार मेट्रिक टन वजनाचे गर्डर माझगाव डॉक, न्हावा येथून मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे. येत्या दोन दिवसांत हा गर्डर सी-लिंकला जोडण्यासाठी बसवण्यात येणार आहे.

कोस्टल रोड- सी-लिंक दरम्यान ४६, ४४ आणि ६० मीटरचे तीन गर्डर याआधी बसवण्यात आले आहेत. या कामात महत्वाचा टप्पा असलेल्या १३६ मीटरच्या सर्वात मोठ्या बो स्ट्रिंग आर्च गर्डरची बांधणी रायगड जिल्ह्यातील माझगाव डॉक, न्हावा येथे करण्यात आली आहे. रविवारी न्हावा जेट्टीवरून हा गर्डर बार्जमध्ये टाकून वरळीच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे. सी लिंकला जोडण्यासाठी पिलर ७ व पिलर ९ च्या मध्ये हा गर्डर बसविण्यात येणार आहे. हा गर्डर बसविणे कोस्टल रोड प्रकल्पातील आव्हानात्मक टप्पा असल्याचे बोलले जाते आहे. अरबी समुद्रात भरती व ओहोटीचा अंदाज घेऊन हा गर्डर बसवण्यात येणार आहे. गर्डरला जपानी तंत्रज्ञानाने कोटिंग करण्यात आले असून, पुढील २५ ते ३० वर्षें गंज पकडणार नाही. तसेच तो पुढील १०० वर्षें टिकेल, इतका मजबूत असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

'असा' आहे गर्डर

  • माझगाव डॉक, न्हावा जेट्टीवर बांधणी

  • लांबी : पिलर टू पिलर १३६ मीटर

  • वजन : दोन हजार मेट्रिक टन

  • जपानी तंत्रज्ञानाने केलेले कोटींग

  • २५ ते ३० वर्षें गंज पकडणार नाही

  • गर्डरमुळे पुलाचे आयुष्य १०० वर्षें

फुटबॉल ग्राऊंडच्या आकाराचा बार्ज

गर्डर जोडणीनंतर वरळी येथून कोस्टल रोड सी-लिंकला जोडला जाणार आहे. त्यामुळे वाहनांना सध्या सी लिंक वरळीला जिथे संपतो तिथे वाहतूककोंडीचा सामना करावा लागणार नाही. ही वाहने सी-लिंक ते कोस्टल रोडने थेट दक्षिण मुंबईत येऊ शकतील. प्रिफॅब्रिकेटेड आणि प्रिसेम्बल केलेला हा गर्डर माझगाव डॉक जेटी (न्हावा) येथून मोठ्या फुटबॉल ग्राऊंडच्या आकाराच्या बार्जमध्ये लोड करण्यात आला आहे, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in