अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीसाठी आचारसंहिता लागू

निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याची तारीख सात, तर नामनिर्देशन पत्रे सादर करण्याची अखेरची तारीख १४ ऑक्टोबर होती
अंधेरी पूर्व विधानसभा  पोटनिवडणूकीसाठी आचारसंहिता लागू

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या १६६-अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे ३ ऑक्टोबर २०२२पासून अंधेरी (पूर्व) या विधानसभा मतदार संघ क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीकरिता मतदान गुरूवार, दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ रोजी होणार आहे, अशी माहिती मुंबई उपनगर जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी दिली आहे.

निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याची तारीख सात, तर नामनिर्देशन पत्रे सादर करण्याची अखेरची तारीख १४ ऑक्टोबर होती. ३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून ६ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येईल. या पोटनिवडणुकीसाठी १ जानेवारी, २०२२रोजीच्या अहर्ता दिनांकावर आधारित मतदार यादी वापरण्यात येणार आहे. या पोटनिवडणुकीत मतदानासाठी इव्हीएम व व्हीव्हीपॅटचा वापर केला आहे.

या पोटनिवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज भरताना गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना त्यासंदर्भातील माहिती वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवर देणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर उमेदवार ज्या पक्षाकडून प्राधिकृत आहे, त्या पक्षालाही संबंधित उमेदवाराची माहिती वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी आणि पक्षाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ज्या उमेदवाराला किंवा राजकीय पक्षाला वृत्तपत्रे किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे उमेदवाराची प्रसिद्धी करावयाची असल्यास ती जाहिरात व विहित नमुन्यातील फॉर्म 'माध्यम संनियंत्रण व प्रमाणन समिती' कडे सादर करून प्रमाणित करून घेणे गरजेचे आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in