

देवश्री भुजबळ/मुंबई
गेटवे ऑफ इंडियाजवळील रेडिओ क्लब येथील जेट्टीचे काम डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण झाल्यावर, कुलाब्याहून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अवघ्या १६ मिनिटांत पोहोचता येईल, अशी माहिती बंदरे विकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश नारायण राणे यांनी दिली. कोकण भागातील कणकवलीचे तीनवेळा आमदार राहिलेले राणे यांनी मंगळवारी नरिमन पॉइंट येथील ‘द फ्री प्रेस जर्नल’ व ‘नवशक्ति’च्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली आणि संवाद साधला. या संवादातील काही प्रमुख अंश.
डिसेंबर २०२४ मध्ये तुम्ही बंदरे विकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यापासून, तुमच्या मंत्रालयांची तीन मोठी यशोशिखरे कोणती आहेत?
बंदरे विभागाचा विचार केला तर, महाराष्ट्राचे स्वतःचे असे जहाज बांधणी (शिपबिल्डिंग), जहाज तोडणी (शिपब्रेकिंग) आणि जहाज दुरुस्ती (शिप रिपेअर) धोरण कधीच नव्हते. आम्ही सरकारच्या पहिल्या १०० दिवसांत हे धोरण आणले. आता, ज्या कोणालाही राज्यात जहाज बांधणी केंद्र सुरू करायचे असेल, त्यांना या धोरणाचा मोठा फायदा घेता येईल. याअंतर्गत जमीन संपादनापासून ते पर्यावरण मंजुरीपर्यंतची सर्व प्रक्रिया राज्य सरकारतर्फे जलद गतीने पूर्ण केली जाईल.
मत्स्यव्यवसाय विभागांतर्गत आम्ही मत्स्यव्यवसायाला शेतीचा दर्जा दिला. यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या योजना आणि लाभ आता मच्छीमारांनाही मिळतील. यामध्ये किसन क्रेडिट कार्ड, वीज बिलातील सवलती इत्यादींचा समावेश आहे. वास्तविक पाहता, सहा महिन्यांपूर्वी एका केंद्रीय संस्थेचा अहवाल आला होता, ज्यामध्ये महाराष्ट्रातील मासे उत्पादनात ४७% वाढ झाल्याचे नमूद केले होते, जे एक मोठे यश आहे. आम्ही केवळ मच्छीमारांसाठी एक राज्यस्तरीय योजनाही सुरू केली. मी जेव्हा मत्स्यव्यवसाय मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली, तेव्हा वार्षिक बजेट २१२ कोटी रुपये होते, ते आता वाढून १,२४० कोटी रुपये झाले आहे.
कोकण रेल्वे विस्तार प्रकल्पाचे ताजे अपडेट काय आहे?
कोकण रेल्वेला दरमहा ५,००० कोटी रुपयांचा तोटा होत आहे. माझे वडील आणि सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी कोकण रेल्वेचे मध्य रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव दिला आहे. कोकण रेल्वेची स्वतःची आव्हाने आणि प्रवाशांच्या मागण्या आहेत आणि आता ती स्वतंत्रपणे चालवणे व्यवहार्य राहिलेले नाही. कोकण रेल्वेला पूर्णपणे नवसंजीवनी देण्याची गरज असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः केंद्र सरकारकडे याविषयी पाठपुरावा करत आहेत.
मुंबई-गोवा महामार्ग दुरुस्तीनंतर वाहनधारकांसाठी कधीपर्यंत खुला होईल?
हा महामार्ग जवळपास तयार आहे. फक्त इंदापूरजवळील एका टप्प्याचे काम सुरू आहे, जे पुढील ४५ दिवसांत पूर्ण होईल. गणपती उत्सवासाठी लोक या महामार्गावरून प्रवास करू शकतील. प्रसारमाध्यमे विनाकारण इंदापूरमधील त्या एका खराब पॅचला (रस्त्याच्या तुकड्याला) जास्त हायलाईट करत आहेत.
तुम्ही अलीकडेच गुजरातच्या मुंद्रा बंदराला भेट दिली होती. महाराष्ट्रातही असे काही सुरू करण्याचा तुमचा विचार आहे का?
आम्ही अदानी समूहाकडे मुंद्रा बंदराचा दुसरा टप्पा (फेज २) महाराष्ट्रात उभारण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मुंद्रामध्ये मालवाहतुकीवर (कार्गो) जास्त भर दिला जातो. मी मुंद्रा बंदराच्या दौऱ्यावरून परत आल्यावर लगेचच मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगितले की, जर महाराष्ट्राला बंदरांच्या क्षेत्रात आघाडीवर राहायचे असेल, तर आपल्याला मालवाहतूक आणि क्षमता निर्मितीवर लक्ष केंद्रित करावे लागेल. आपल्याला अधिक गुंतवणूकदार-स्नेही धोरणांवर काम करावे लागेल. महाराष्ट्रात अधिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याची गरज आहे.
तुम्ही सिंधुदुर्गचे पालकमंत्री आहात. जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी तुमच्या काय योजना आहेत?
सिंधुदुर्गमध्ये पर्यटनाची प्रचंड क्षमता आहे. ताज समूह तिथे आधीच एक मोठे हॉटेल उभारत आहे. आम्ही व्यावसायिकांना आदरातिथ्य (हॉस्पिटॅलिटी) आणि वेलनेस उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित करत आहोत आणि याबाबतीत सर्व प्रकारचे सहकार्य करू. आम्हाला रोजगाराच्या संधी निर्माण करायच्या आहेत आणि उलट स्थलांतराला (रिव्हर्स मायग्रेशन) प्रोत्साहन द्यायचे आहे. आम्ही एका 'डिस्नेलँड' प्रकल्पाचेही नियोजन करत आहोत, जो पर्यटकांसाठी एक मुख्य आकर्षण ठरेल.
गेटवे ऑफ इंडियाजवळील बहुचर्चित रेडिओ क्लब जेट्टीची सध्याची स्थिती काय आहे?
पावसाळ्यानंतर याचे काम पुन्हा सुरू होईल आणि १९६ कोटी रुपयांचा हा प्रकल्प डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे आमचे नियोजन आहे. या कामासाठी नवीन कंत्राटदार नियुक्त करण्यात आला आहे, कारण मागील कंत्राटदार वेळेपेक्षा मागे चालल्यामुळे त्याचे कंत्राट रद्द करण्यात आले होते. महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डामध्ये आम्ही कंत्राटदारांसाठी एक कडक वेळापत्रक तयार केले आहे, जेणेकरून मुदतवाढ देऊन प्रकल्पांना उशीर होणार नाही. यामुळे विभागात एक शिस्तही निर्माण होते. गेटवे ऑफ इंडियाजवळील जेट्टी हा मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. तो नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या वॉटर टॅक्सी टर्मिनलशी जोडला जाईल. त्यामुळे कुलाब्याहून विमानतळावर वॉटर टॅक्सीने अवघ्या १६ मिनिटांत पोहोचता येईल. पालघरमधील वाढवण बंदरातही वॉटर टॅक्सी टर्मिनल असेल. २०२८ पासून सुरू होणारा ‘मुंबई वॉटर मेट्रो’ प्रकल्प संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्राला जोडेल. यामुळे नरिमन पॉइंट ते जुहू, वरळी ते वर्सोवा इत्यादी ठिकाणी जलमार्गाने प्रवास करता येईल.