मुंबईत पुढील दोन दिवस हवाहवासा ‘गारवा’; गेल्या चार वर्षांत ४ मार्च सर्वात थंड दिवस

एरव्ही मार्च महिना उजाडला की तळपत्या उन्हाने अंगाची लाहीलाही होते. पण यंदा मार्च महिन्यातही सुखद गारवा जाणवत असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
मुंबईत पुढील दोन दिवस हवाहवासा ‘गारवा’; गेल्या चार वर्षांत ४ मार्च सर्वात थंड दिवस
Published on

मुंबई : एरव्ही मार्च महिना उजाडला की तळपत्या उन्हाने अंगाची लाहीलाही होते. पण यंदा मार्च महिन्यातही सुखद गारवा जाणवत असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेमुळे मुंबईसह किनारपट्टीवर दिवसा आणि संध्याकाळीही थंड वारे वाहत आहेत. त्यामुळे वातावरणात गारवा पसरला असून सोमवार, ४ मार्च हा गेल्या चार वर्षांतील मार्च महिन्यातील सर्वात थंड दिवस म्हणून नोंदला गेला आहे. इतकेच नव्हे तर पुढील काही दिवस मुंबईकरांना ‘थंडा थंडा, कुल कुल’चा अनुभव घेता येणार आहे.

दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव आणि लक्षद्वीप बेटांवरील चक्रीवादळाच्या स्थितीमुळे राज्यातील वातावरणात अचानक बदल झाला आहे. रविवारपासून थंड वारे वाहत असून सोमवारी मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक शहरांमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यानंतर मुंबईतील तापमानात किमान ८ ते १० अंशांनी घट झाली आहे. त्यामुळे मायानगरी मुंबईतील किमान तापमान १८ ते १९ अंशांवर पोहोचले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, मुंबईत पुढील दोन दिवस वातावरण थंड राहणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि पुणे येथे पुढील तीन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

उत्तरेकडून येणारा थंड हवेचा प्रवाह अरबी समुद्रावरून वाटचाल करत मुंबई किनारपट्टीवर पोहोचला आहे. त्यामुळे मुंबईतील तापमानात कमालीची घट झाली आहे. सोमवारी जळगावमध्ये १३.२, नाशिकमध्ये १२.४ तसेच पुण्यामध्ये १३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. मुंबईत रविवारी रात्री किमान तापमान १७.९ अंश सेल्सिअस इतके होते. आता पुढील दोन ते तीन दिवस मुंबईत असाच सुखद गारवा जाणवणार आहे.

उकाड्यापासून मुंबईकरांची सुटका

मुंबईत शुक्रवार, १ मार्च रोजी ३७.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती. पण रविवारपासून अचानक थंड वारे वाहू लागल्यामुळे सोमवारी किमान तापमान १८ अंश सेल्सिअस व कमाल तापमान २२ अंश सेल्सिअस इतके घसरले. त्यामुळे हवेत गारवा जाणवत होता. नागरिकांनी स्वच्छ धुवून पुन्हा कपाटात ठेवलेले स्वेटर पुन्हा बाहेर काढले आहेत. तापमान घसरल्याने आता पुढील काही दिवस नागरिकांची उकाड्यापासून सुटका होऊन त्यांना सुखद गारवा अनुभवता येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in