मालाड रेल्वे स्थानकात लोकलमध्ये कॉलेज तरुणीचा विनयभंग

या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत बोरिवली रेल्वे पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते.
मालाड रेल्वे स्थानकात लोकलमध्ये कॉलेज तरुणीचा विनयभंग

मुंबई : मालाड रेल्वे स्थानकात एका कॉलेज तरुणीचा विनयभंग करून अज्ञात आरोपीने पलायन केले. याप्रकरणी बोरिवली रेल्वे पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या आरोपीचा सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने शोध सुरू केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम यांनी सांगितले. तक्रारदार तरुणी ही २० वर्षांची असून, ती तिच्या कुटुंबीयांसोबत मालाड येथे राहते. गुरुवारी सकाळी पावणेनऊ वाजता ती मालाड येथून चर्चगेटला जाण्यासाठी आली होती. सकाळची वेळ असल्याने चर्चगेटला जाणाऱ्या लोकलला प्रचंड गर्दी होती. त्यामुळे ती अपंग डब्यात चढत असताना मागून एका अज्ञात व्यक्तीने तिला अश्लील स्पर्श करून तिचा विनयभंग केला होता; मात्र गर्दीमुळे तिला त्याला पाहता आले नाही. दुसऱ्या दिवशी तिने घडलेला प्रकार बोरिवली रेल्वे पोलिसांना सांगितला. ३६ तासांनंतर तिने पोलिसांना तक्रार केली होती. त्यामुळे तिची जबानी नोंदवून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदविला आहे. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत बोरिवली रेल्वे पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशांनतर पोलिसांनी मालाड रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in